google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील दिव्यांगांना प्रत्येकी 6000 रू. आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय

Breaking News

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील दिव्यांगांना प्रत्येकी 6000 रू. आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील दिव्यांगांना प्रत्येकी 6000 रू. आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय


लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती


सांगोला/प्रतिनिधी ः जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेमार्फत सांगोला नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांच्या बँक खात्यावर आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येकी 6000/- रू. एवढी रक्कम जमा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.


सन 1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो. केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी केलेल्या कायद्यानुसार कलम 40 अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिव्यांग नागरिकांना दारिद्र्य निर्मूलन योजने अंतर्गत 5% निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत व सदर 5% निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याकरीता मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.


मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे  दिव्यांग नागरिक हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात असताना सांगोले शहरातील 97 नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी 6000/- रुपये प्रमाणे 5 लाख 82 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य जुलै महिन्यात सांगोले नगरपरिषदेमार्फत करण्यात आले होते. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आज पुन्हा एकदा सर्व पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रति लाभार्थी 6000/- एवढी रक्कम या लाभार्थ्यांच्या खात्यावर  जमा करण्याचा मोठा निर्णय सांगोले नगरपरिषदेमार्फत घेण्यात आला. सदर आर्थिक सहाय्य लवकरच सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जाईल, असे आश्वासन सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांनी दिले.

नगरपरिषदेची महत्वाची सर्वसाधारण सभा असतानाही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे गैरहजर होते. तसेच प्र. कार्यालयीन अधिक्षक पदाचा कारभार असणार्‍या अधिकारी याही सुरूवातीस गैरहजर होत्या. यामुळे सभा सुरू होताना गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. तसेच मुख्याधिकारी सदर सर्वसाधारण सभेस गैरहजर का राहिले, याचे कारणही समजू शकले नाही. यावरून या अधिकार्‍यांना शहराच्या विकासाचे काही देणे-घेणे आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा मुख्याधिकारी यांनी केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे काही नगरसेवकांनी सभागृहामध्ये उघडकीस आणून दिल्याने सभा अधिक्षकांनी सदरची चूक दुरूस्त करत लगेच ठराव दुरूस्ती केली. कोणत्याही विषयाला सभागृहाने मान्यता दिल्यानंतरच तो विषय सभागृहामध्ये मंजूर होतो आणि त्या ठरावामध्ये शेवटी ही सभा सर्वानुमते मंजूरी देत आहे, असा शब्दप्रयोग केला जातो. परंतू काही ठरावांमध्ये सदर विषयांस आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे मुख्याधिकारी यांना एखाद्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार आहे का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 सांगोला खरेदी विक्री संघाचे चेअरमन कै. पी.डी.(आप्पा) जाधव यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. सांगोला शेकाप पक्षाचे ते ज्येष्ठ नेते व स्व.आ. गणपतराव देशमुख यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच त्यांनाही सभागृहामध्ये दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला

Post a Comment

0 Comments