सोलापूर : ' ओमीक्रोन ' मुळे शाळा सुरुचा निर्णय बदलणार
सोलापूर : दक्षिण आफ्रिकेत 'ओमीक्रोन' हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकारने आज नवीन नियमावली जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही, आणखी तसा काहीच निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची तयारी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीच हजार शाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. तर महापालिकेच्या पहिली ते सातवीच्या ३५८ शाळांमध्ये जवळपास एक लाखांपर्यंत विद्यार्थी आहेत. सध्या शालेय शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या आदेशानुसार शहरातील आठवी ते बारावीच्या तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरु आहेत. सध्या आठवी ते बारावीच्या ५६ शाळा सुरु आहेत.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या एक हजार ८७ शाळा सुरु आहेत. आता नवीन आदेशानुसार ग्रामीण व शहरातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. कोरोनामुळे मार्च २०२० पासून पहिली ते चौथीच्या शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाचन, अंकगणित विसरले असून त्यांच्या भवितव्याची चिंता वाढली आहे. बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर गेले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे ॲन्ड्राइड मोबाइल नाहीत, अशा मुलांसाठी ऑफलाइन शिक्षण सुरु केले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ऑफलाइन शाळा सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने व महापालिकेने तयारी सुरु करीत मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित करून त्यांना सूचना केल्या आहेत. मात्र, शासनाकडून अजूनपर्यंत तसे लिखित आदेश आलेले नाहीत.
लिखित आदेशाशिवाय शाळा सुरु होणार नाहीत
शहरी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथी, पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी घेतला. परंतु, त्यासंदर्भातील कोणतेही लिखित आदेश प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाचा लिखित आदेश आल्याशिवाय महापालिकेच्या शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाहीत, अशी माहिती प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी दिली.
१ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची तयारी केली असून काही शाळांनाही भेटी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून कोरोना होणार नाही, याची तंतोतंत खबरदारी घेतली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करून शाळा सुरु होतील. शाळा सुरु होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गरजेचे आहे.
- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद
0 Comments