भीमनगर येथील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नाही केली तर नगरपालिका आणि मुख्याधिकाऱ्याच्या केबिनला टाळे ठोकणार-- वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष मा.विकास बनसोडे.
निद्रिस्त आरोग्य विभाग आणि अकार्यक्षम नगरसेवक कधी करणार जनकल्याण ?
सांगोला (प्रतिनिधी) "माझी वसुंधराचे गोंडस शब्द सर्व सामान्य शहर वासीयांच्या माथी मारून प्राथमिक गरजा ची पूर्तता करण्यास सांगोला नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,मुख्याधिकारी आणि नगरसेवक मात्र जनतेच्या मूलभूत प्रश्नांची पायमल्ली करीत असून त्याचा त्रास सांगोला शहरातील नागरिकांना होताना दिसून येत आहे.शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून निद्रिस्त आरोग्य विभाग आणि अकार्यक्षम नगरसेवकांच्या चुकीमुळे शहरवासीयांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या दिसून येत आहेत. येत्या दोन दिवसांत नगरपालिका आरोग्य निरीक्षकांनी आणि आरोग्य सभापती, पदाधिकारी यांनी भीमनगर येथील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नाही केली तर नगरपालिकेला आणि "एसीत बसून "स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला"ची स्वप्ने रंगविणाऱ्या मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आलिशान केबिनला टाळे ठोकणार असल्याचा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विकास बनसोडे यांनी दिला आहे.
सांगोला नगरपालिका ही "क" नगरपालिका क्षेत्रात येत आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये नगरपालिका निवडणूका डोळ्या समोर ठेवून कोट्यवधींची विकास कामांची जाहिरातबाजी केली जात आहे. पण शहरातील उपनगरामधील अनेक गटारी उघड्या आहेत,रस्त्याची दुरावस्था ठेकेदारांच्या हेकेखोर वृत्तीमुळे प्रलंबित आहेत. वर्षांपासून भूमिगत असलेले आणि जनसंपर्क नसलेले नगरसेवक मात्र आता लोकांत मिसळत आहेत,त्यांना कित्येक वेळा सांगून सुद्धा भीमनगर येथील नागरिक वैतागले आहेत.अडचणींचा पाढा सांगताच विद्यमान नगरसेवक पळ काढत असल्याचा आरोप सुद्धा विकास बनसोडे यांनी केला आहे.
काही नगरसेवक मात्र नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात अपयशी ठरले आहेत.त्या नागरिकांच्या समोरून विद्यमान नगरसेवक मात्र तोंड लपवून गाडीला किक मारून जात असल्याचा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे. भीमनगर येथील वयोवृद्ध नागरिक,महिला आणि तरुण या सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत.त्याच शौचालयाचे दरवाजे निखळून पडले आहेत, पाण्याच्या तोट्या मोडून पडलेल्या आहेत,लाईटची दुरावस्था न सांगण्यासारखी झालेली आहे. पाणी साचलेले आहे,त्यामध्ये डासांचे प्रमाण वाढलेले आहे.अशा या शौचालयाची दुरुस्ती करून रंगरंगोटी येत्या दोन दिवसांत नाही केली तर नगरपालिकेला आणि मुख्याधिकाऱ्याच्या केबिनला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शेवटी विकास बनसोडे यांनी दिला आहे.
0 Comments