संपात सहभागी न झाल्याने BJP जिल्हाध्यक्षाची विभाग नियंत्रकाला दमदाटी !
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरच्या विभाग नियंत्रकांना संपात का सहभागी होत नाहीत, म्हणून दमदाटी केली.
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून काम बंद आंदोलन (ST Strike) सुरू आहे. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी मागणीवर ठाम आहेत.दरम्यान, शुक्रवारी (ता. 12) भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरच्या विभाग नियंत्रकांना संपात का सहभागी होत नाहीत, म्हणून दमदाटी केली. तर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, त्यांना कामावर जाण्याची सक्ती करू नका, असे म्हणून त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर आगारातील परिवहन कर्मचारी हे आगारासमोरच आंदोलनासाठी बसले आहेत. शुक्रवारी (ता. 12) दुपारी तीनच्या सुमारास भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पाटोळे, धनश्री खटके, सविता कस्तुरे यांनी सोलापूर विभागाच्या आगार नियंत्रकाच्या कार्यालयात धाव घेतली. मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी, तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी का होत नाही, असा जाब विचारला. शासनाकडून एसटी महामंडळ बंद ठेवण्यासंदर्भातील सूचना नाहीत. संपामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांची समजूत काढली जात असल्याचे त्या सर्वांना सांगितले. तरीही, देशमुख यांनी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्या, अन्यथा तुम्ही काम कसे करता हे बघून घेतो, अशी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पोळ हे करीत आहेत.
फिर्यादी राठोड यांच्या फिर्यादीनुसार...
तुम्ही एसटी चालक-वाहकांच्या संपात सहभागी का होत नसल्याचा त्या लोकांनी विचारला जाब
तुम्ही चालक-वाहकांना कामावर जा म्हणून जबरदस्ती करू नका म्हणून केली दमदाटी
कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तुम्ही काम कसे करता बघून घेतो म्हणून कार्यालयातून जाण्यास केला अडथळा
भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल
0 Comments