आबासाहेबांनी कधीही विकासाला अडचण येऊ दिली नाही- गटनेते आनंदा माने सांगोला येथे सर्वपक्षीय शोकसभा संपन्न
सांगोला ( प्रतिनिधी ) : आबासाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे सांगोला शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत . जवळ जवळ साडे सात कोटींची कामे सध्या सांगोला शहरात सुरू आहेत . तीन ते चार दिवसातून दररोज विविध विकास कामांचे उद्घाटन होत आहे . याचे पूर्ण मार्गदर्शन आबासाहेबांनी केले होते . आबासाहेबांनी कधीही विकासाला अडचण येऊ दिली नाही . शेवटच्या का काळात असेना आबासाहेबांचे चांगले मार्गदर्शन मिळाले .
आबासाहेबाकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे . कोणत्याही कामासाठी आबासाहेबांकडे भेटण्यासाठी गेल्यानंतर आबासाहेबांनी त्या सर्व कामासंदर्भात योग्य मार्गदर्शन केले असल्याचे गटनेते आनंदा माने यांनी सांगून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली . सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक व आरपीआयचे नेते सुरजदादा बनसोडे यांनी काल शनिवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह , सांगोला येथे केले होते . यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख , गटनेते आनंदा माने , काँग्रेसचे हरिभाऊ पाटील , उपसभापती नारायण जगताप , माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे , नगरसेविका स्वाती मगर यांच्यासह नगरपरिषदेचे नगरसेवक , पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , सर्वपक्षीय कार्यकर्ते , विविध पक्षाचे पदाधिकारी , सदस्य व नागरिक उपस्थित होते .
यावेळी गटनेते आनंद माने बोलत होते . आबासाहेबांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही.सांगोला तालुक्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात आबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे . आबासाहेबांनी आयुष्यभर समाजकारण केले असून निवडणुकीनंतर राजकारणाला कधी थारा दिला नाही . तालुक्याच्या विकासासाठी आबासाहेब रात्रंदिवस झटले असून त्याचे विचार , त्यांची तत्वे यापुढील काळात सर्वांनी पुढे घेऊन जाणे हीच खरी श्रद्धांजली असेल असा शोक शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त करण्यात आला . तालुक्यातील ८४ गावची पाणीपुरवठा योजना आबासाहेबांनी मंजूर करून आणली असून त्यामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे . गेल्या पन्नास - पंचावन्न वर्षापासून आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात विकासाचा डोंगर तयार केला आहे .
आबासाहेबांनी शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही आदर देऊन सन्मानाची वागणूक दिली . आबासाहेबांनी कधीही सूड उगवायची भावना केली नाही . सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आबासाहेबांनी केले आहे . तालुक्यात कायदा सुव्यवस्था व जातीय भेदभाव कधीही केला नाही . आबासाहेबांचे जीवन हे सुगंधी अगरबत्ती सारखे होते . तालुक्याच्या विकासासाठी आबासाहेबांनी बेरजेचे राजकारण करत विकासासाठी कधीही आडकाठी आणली नाही . आबासाहेबांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे . आबासाहेबांमुळे तालुक्यातील सर्व जाती - धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत . श्रेयवादासाठी आबासाहेबांनी कधीही प्रयत्न केला नसून आबासाहेबांमुळे तालुक्याचा विकास झाला असल्याचे विचार शोक शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केला . आबासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन ही मान्यवरांनी केले .
या शोकसभेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख , अँड गजानन भाकरे , मानस कमलापुरकर , शहाजी गडहिरे , नागेश जोशी , सुब्राव बंडगर सर , प्रा.नानासाहेब लिगाडे , उल्हास धायगुडे - पाटील , सचिन कांबळे यांनी शोक व्यक्त करून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली . प्रास्ताविक नगरसेवक सुरज बनसोडे , पत्रकार नागेश जोशी यांनी केले तर आभार विठ्ठलराव शिंदे सर यांनी मांडले . यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले .
0 Comments