दहापेक्षा अधिक रुग्ण ! गावात बाहेरून येणाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक
सोलापूर : माळशिरस तालुक्यात चार, पंढरपूर तालुक्यातील दहा, सांगोल्यातील पाच अशा एकूण 30 ते 35 गावांमध्ये दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्या ठिकाणी आता प्रतिबंधित क्षेत्र करून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे .गावातील 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण व गावातील सर्व व्यक्तींसह गावात येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहर-ग्रामीणमधील एक लाख 99 हजार 873 जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये 80 हजार 349 महिला तर एक लाख 19 हजार 424 पुरुषांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत शहरातील 17 तर ग्रामीणमधील एक हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीणमध्ये बुधवारी अक्कलकोट तालुक्यात एक तर दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. बार्शी तालुक्यात 18, करमाळ्यात 34, माढा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी 36, मंगळवेढ्यात 15, मोहोळ तालुक्यात आठ, सांगोल्यात 14 आणि पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 37 रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील 26 पैकी एकूण 16 प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात प्रभाग क्र. एक ते पाच, दहा ते 13, 16 ते 20 आणि 22 व 25 या प्रभागात सद्य:स्थितीत एकही रुग्ण ऍक्टिव्ह राहिलेला नाही. म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण वाढलेला नाही. शहरात आज तीन महिला कोरोना बाधित आढळल्या असून एकूण रुग्णसंख्या आता 29 हजार 263 झाली आहे. तर ग्रामीणमध्ये बुधवारी 199 रुग्णांची भर पडली असून सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्णांची संख्या व मृत्यू कमी व्हावेत म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी माळशिरस, पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा या ठिकाणी दौरे नियोजित केले आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी, याचे धडे त्यांना दिले जात आहेत.
कोरोना रुग्णांची स्थिती
एकूण रुग्ण : 1,99,873
कोरोनामुक्त रुग्ण : 1,93,205
कोरोनाचे बळी : 4,948
ऍक्टिव्ह रुग्ण : 1,620
शहरात दोन दिवसांत चार महिलांना कोरोना
शहरातील कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे. दररोज आठशेच्या सरसरीने संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. मंगळवारी (ता. 21) शहरातील एका महिलेला तर बुधवारी तीन महिलांना कोरोनाची बाधा झाली. दोन दिवसांत एकही पुरुष कोरोना बाधित आढळला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
0 Comments