सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा व अंगणवाड्यांमध्ये 'भारतनेट' अंतर्गत इंटरनेट जोडणी केली जाणार आहे.
आतापर्यंत १२८ ग्रामपंचायतींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.डिसेंबरअखेर बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये ते नेटवर्क उभारले जाणार आहे.राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महानेट, प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, एसटी महामंडळ या विभागांचा आढावा गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता ए. बी. खेडकर, उपअभियंता एम. एम. अटकळे, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, एसटीचे विभाग नियंत्रक विलास राठोड, यंत्र अभियंता विवेक लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर, विभागीय अभियंता विरसंग स्वामी आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, शासनाकडून लॉकडाउन काळात रिक्षाचालकांना मदत जाहीर झाली. मदतीपासून एकही पात्र रिक्षाचालक वंचित राहू नये. शाळा, कॉलेज लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे एसटी बसचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक मार्गावर एसटीची सेवा सुरू करावी, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही. मालवाहतुकीतून सोलापूर आगाराला तीन कोटींचे उत्पन्न मिळाले असून, त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा त्यांनी सूचना केल्या.
0 Comments