दूध संघात माढा , करमाळा , सांगोला किंगमेकर !
तयारी निवडणुकीची जिल्हा दूध संघाशी संलग्नित असलेल्या फक्त 774 संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत .
सोलापूर : राज्यातील ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी संपला आहे, अशा संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्यासाठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यास सहकार निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. जिल्हा दूध संघाशी संलग्नित असलेल्या फक्त 774 संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. 774 मधील निम्म्याहून अधिक तब्बल 460 संस्था माढा, करमाळा आणि सांगोला तालुक्यातील आहेत. त्यामुळे दूध संघाच्या आगामी निवडणुकीत हे तीन तालुकेच किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.
21 सप्टेंबरपासून दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. 21 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत दूध संस्थांकडून ठराव घेतले जाणार आहेत. संस्थेच्या वतीने प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबतचा ठराव करण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 774 संस्था पात्र ठरल्या आहेत. या संस्थांकडूनच ठराव घेतले जाणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 228 संस्था या माढा तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल करमाळा तालुक्यातील 126, सांगोला तालुक्यातील 106, मोहोळ तालुक्यातील 96, मंगळवेढा तालुक्यातील 92, बार्शी तालुक्यातील 39, पंढरपूर तालुक्यातील 26, उत्तर सोलापूर तालुक्यातील 27, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 26 आणि अक्कलकोट तालुक्यातील 8 संस्थांचा समावेश आहे.
वर्षाअखेर निवडणूक?
माजी आमदार दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ बरखास्त करून दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचा कालावधीही संपला आहे. कोणतेही अडथळे आले नाहीत तर साधारणत: नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये जिल्हा दूध संघासाठी प्रत्यक्ष निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments