वारकऱयांना आता दरमहा 5 हजार रुपये मानधन, कोविड काळात सरकारची मदत
कोरोना काळात अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. त्यापाठोपाठ वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही पाच हजार रुपयांचे मानधन देण्याची मागणी केली. याविषयी सांस्कृतिक कार्य विभागाने सकारात्मक भूमिका घेतल्याने लवकरच अन्य कलाकारांसोबत वारकरी संप्रदायातील कलाकारांचाही प्रश्न सुटणार आहे.
वारकरी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. कोरोना काळात वारकरी संप्रदायाची दुरवस्था झाली असून राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीवर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोरोना काळात पाच हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. जिह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱयांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल, असे अमित देशमुख म्हणाले. सध्या राज्यात 10 हजारांपेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक असून याचा लाभ या सर्वांना होणार आहे.
वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले होते. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
मंदिरे सुरू करण्याचा आग्रह नाही परमेश्वर हा जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याचा वारकरी संप्रदायाचा कोणताही आग्रह नाही. आंदोलने करून राजकीय नेत्यांनी जनतेच्या जिवाशी खेळू नये. मात्र त्यानंतरही हे न थांबल्यास वारकरीही मंदिर उघडण्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविरोधात उभे राहतील, असा इशारा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिला आहे.
0 Comments