मंडलअधिकारी,तलाठी यांना मारहाण ; ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यात १३ ऑगस्ट पासून लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत . मात्र आदेशाचा भंग करून सोमवारी घेरडी ता.सांगोला येथे आठवडा बाजार भरवला होता .
दरम्यान लोकांना गर्दी करून नका म्हणून सांगणाऱ्या मंडल अधिकारी , तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ , दमदाटी , मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी घेरडी येथील ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . सोमवार १६ ऑगस्ट रोजी घेरडीचे पोलीस पाटील यांनी घेरडी गावात आठवडाबाजार भरला आहे असा मेसेज जवळा मंडळ व्हाट्सअप ग्रुपवर टाकला .
त्यानंतर मंडल अधिकारी धनंजय इंगोले व घेरडीचे तलाठी कुमाररवी राजवाडे असे दोघेजण घेरडी ता . सांगोला येथे गेलो असता गावामध्ये आठवडा बाजार असल्यामुळे लोकांची बरीच गर्दी जमलेली दिसून आली . त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम गळवे व बसवेश्वर लंबे यांना सोबत घेऊन लोकांना गर्दी करु नका असे सांगत होते . दरम्यान घेरडी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास मधुकर करे यांनी मी ग्रामपंचायत सदस्य आहे . मला तुम्ही का सांगता , आम्ही जाणार नाही असे म्हणुन मंडल अधिकारी इंगोले यांना दमदाटी केली . त्यानंतर श्रीनिवास करे याने तुमचे गावात काय काम आहे
, आमचे आम्ही बघुन घेतो,असे म्हणुन मंडल अधिकारी धनंजय इंगोले यांची गच्ची धरुन हाताने चापटा मारुन दंडावर बुक्कीने जोरात ठोसा मारुन मारहाण केली . तसेच गावातील सदाशिव करे , बिरा कांबळे , रंगनाथ बाळु मेटकरी , आगतराव गावडे , हरिदास सदाशिव घुटुकडे व इतर तीन अनोळखी इसमांनी मंडल अधिकारी इंगोले , तलाठी राजवाडे , ग्रामपंचायत कर्मचारी तुकाराम गळवे , बसवेश्वर लंबे यांना शिवीगाळ , दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला . त्यानंतर सदरचा घडलेला प्रकार तहसीलदार अभिजित पाटील यांना फोनद्वारे सांगितला . याप्रकरणी मंडल अधिकारी धनंजय इंगोले यांनी वरील सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
0 Comments