google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गणपतराव आबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार :केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

Breaking News

गणपतराव आबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार :केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 गणपतराव आबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार : रामदास आठवले


गणपतरावआबांची अपूर्ण कामे रिपब्लिकन पक्ष पूर्ण करणार : रामदास आठवले

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रामदास आठवले सांगोल्यात आले होते

सांगोला  : गणपतराव देशमुख हे संपूर्ण महाराष्ट्रात चाणाक्ष, अभ्यासू असणारे व सर्व क्षेत्रांमधील जाण असणारे नेते होते. त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. गणपतराव आबांचे अपूर्ण राहिलेले काम रिपब्लिकन पक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, अशा भावना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी व्यक्त केल्या. 

शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज बुधवारी (ता. 18) रामदास आठवले सांगोल्यात  आले होते. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीवेळी आबांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, नातू बाबासाहेब देशमुख, रतनकाकी देशमुख आदी उपस्थित होते. प्रारंभी आठवले यांनी कै. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.


रामदास आठवले पुढे म्हणाले, गणपतराव देशमुख यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठा गौरव होता. जवळजवळ अकरा वेळा ते विधानसभेत निवडून आले होते. त्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी व पाण्याच्या प्रश्नासाठी मोठा लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता. गणपतराव आबांचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध होते. 1999 व 2004 साली पंढरपूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी माझ्यासाठी मोठे मताधिक्‍य तालुक्‍यातून मिळवून दिले होते. पहिल्या वेळेला जवळजवळ सव्वा लाखाचे मताधिक्‍य एकट्या सांगोल्यामधून मला मिळाले होते. 


त्यांच्याबद्दल मला फार मोठा आदर होता. शेवटपर्यंत ते जनतेच्या कामासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी रिपब्लिकन पक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंत्री या नात्याने आदरांजली वाहतो व त्यांचे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असेही शेवटी आठवले म्हणाले.


या वेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष बापुसाहेब बनसोडे, तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, नगरसेवक सूरज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अंबर काटे, दिगंबर गवळी, जिल्हा चिटणीस राजा मागाडे, शहराध्यक्ष सतीश काटे, धर्मा भडंगे, मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर, सुरेंद्र ढोबळे, तेजस आढाव, सूरज होवाळ, नवा सरतापे, पिंटू सरतापे, दत्ता सावंत, गौतम चंदनशिवे, अर्जुन लांडगे, सखाराम लांडगे, गौतम जगधने, सौदागर सावंत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments