ऑगस्टमध्ये शहरातील विविध भागांमध्ये तब्बल 193 व्यक्ती डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर: कोरोनाचा विळखा कमी झाला असतानाच शहराला आता डेंग्यूचा विळखा पडला आहे.ऑगस्टमध्ये शहरातील विविध भागांमध्ये तब्बल 193 व्यक्ती डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. 27) नऊ महिन्याच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून तिला पूर्वीचा आजारही होता, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जुळे सोलापूर, न्यू पाच्छा पेठ, जोडभावी पेठ, विडी घरकूल या परिसरातील विविध नगरांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन पाण्याचे बॅरेल तपासले जात आहेत. त्यावेळी बहुतेक कुटुंबातील पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जोडभावी पेठेतील 17 वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्याच्या घरावरील पाण्याच्या टाकीत अळ्या आढळल्या होत्या. आता शुक्रवारी मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबातील पाण्यात काहीच आढळले नाही, परंतु शेजारील घरावरील पाण्याच्या टाकीत डासांच्या आळ्या आढळल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. अरूंधती हराळकर यांनी दिली. त्या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली असून नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, असे आवाहन केल्याचेही त्या म्हणाल्या.
शहरात ऑगस्टमध्ये 193 डेंग्यूचे रुग्ण आढळले. शुक्रवारी (ता. 27) शहरातील एका नऊ महिन्याच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. त्याठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी शेजारील घराच्या पाण्याच्या टाकीत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. नागरिकांनी स्वच्छ पाण्याचा अनावश्यक साठा न करता पाणी झाकून ठेवावे.
डॉ. अरूंधती हराळकर, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका
डफरीन हॉस्पिटलमध्ये शहरातील डेंग्यू झालेल्या रुग्णांवर उपचार व्हावेत म्हणून महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मोठा गाजावाजा करून 13 बेड्सचे तात्पुरते हॉस्पिटल सुरु केले. रुग्ण वाढल्यास आणखी खाटा वाढविण्याच्या वलग्ना त्याठिकाणी करण्यात आल्या. मात्र, 60 वर्षांवरील तथा को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेला व्यक्ती) व्यक्ती डेंग्यू झाल्यानंतर उपचारासाठी त्याठिकाणी गेल्यानंतर दाखल करून घेतले जात नाही. दुसरीकडे लहान मुलांनाही उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले जात असल्याचा अनेकांना अनुभव आला. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रक्त चढविणे, प्लाझ्मा वगैरे चढविण्याची सुविधा नाही, तेवढे मनुष्यबळ नसल्याचे उत्तर आरोग्य विभागाने दिले.
0 Comments