13 तारखेपासून या तालुक्यात अधिक कडक लॉकडाऊन
अत्यावश्यक सेवा वगळता इतर राहणार बंद दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आज नवीन आदेश लागू केला आहे. 13 तारखेपासून या तालुक्यांमध्ये अधिक कडक निर्बंध पुढील आदेश येई पर्यंत राहणार आहेत.जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासना कडून नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध लागू करण्या मागे गेल्या १५ दिवसातील वरील तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे . हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील १५ दिवसात माळशिरस तालुक्यामध्ये १९७५, माढा तालुक्यात १२७५, पंढरपूर तालुक्यात १५७४, सांगोला तालुक्यात ९०९, करमाळा तालुक्यात ८९७ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर वरील पाच तालुक्यातील अधिक कडक निर्बंध करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय लागू केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशानुसार अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता, इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी असेल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उघडे राहतील. बिगर अत्यावश्यक सेवा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहतील. हॉटेल चालकांसाठी फक्त पार्सलची सुविधा उपलब्ध असणार आहे. शासकीय कार्यालय व परवानगी दिलेली कार्यालय केवळ 50 टक्के क्षमतेने चालू राहील. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी सर्व अटी व शर्ती सह केवळ 25 लोकांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यविधी साठी केवळ 20 लोकांना परवानगी आहे. विशेष म्हणजे जिम, सलुन, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेससाठी 50% क्षमतेने तर मालवाहतूक करणारे पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकणार आहेत. विवाह कार्यक्रमाच्या ठिकाणी covid-19 चे निगेटीव्ह प्रमाणपत्र अथवा लसीकरण केलेले प्रमाणपत्र नसलेले आढळल्यास एक हजार रुपये दंड व संबंधीत मंगल कार्यालयात दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
0 Comments