वारकऱ्याला करता येणार पायी वारी, मात्र राज्य सरकारने घातली मोठी अट
मुंबई: राज्यात कोरोने थैमान घातलेले असताना यावर्षी सरकारकडून आषाढी वारीसाठी काही निर्बंधसह परवागी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून १० मानाच्या पालख्याना एसटी बसणे जाण्यासाठी मुभा दिली आहे. त्याबाबतचा आदेश आज राज्य सरकारनं काढलाय. त्यानुसार मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आलाय.
वारकऱ्याला करता येणार वाखरीपासून दीड किमी पायी वारी
सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या १० पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करावं लागणार आहे. मात्र, वाखरीपासून दीड किलोमीटरचं अंतर पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.
या आहेत मानाच्या १० पालख्या१) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर ) २) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी ) ३) संत सोपान काका महाराज ( सासवड ) ४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर ) ५) संत तुकाराम महाराज ( देहू ) ६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर ) ७) संत एकनाथ महाराज ( पैठण ) ८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती ) ९) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर ) १०) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )
0 Comments