मंगळवेढयातील डॉक्टर आज काळ्या फिती लावून काम करणार डॉक्टर
आणि रुग्णालयांवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि.१८ जून हा निषेध दिन पाळला जात असून मंगळवेढयातील डॉक्टर काळ्या फिती लावून काम करून निषेध व्यक्त करणार आहेत.या संबंधीचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशन मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.मधूकर कुंभारे व सचिव डॉ.सुरेश होनमाने हे तहसीलदारांना आज देणार आहेत.डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत येईल ,सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात , रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे , हल्लेखोर व्यक्तीवरील खटले जलद न्यायालयात चालवावेत.या आय.एम.ए.च्या मागण्या आहेत . वारंवार सदर मागण्यांबाबत आंदोलने करण्यात आली असूनदेखील केंद्र सरकारने अदयाप कडक कायदा लागू केलेला नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण भारतातील डॉक्टर समुदायाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेले असतानाही या काळात रुग्णालयांवर होणारे हल्ले हे मानव जातीला काळीमा फासणारे आहेत.या संदर्भातील मागण्या आणि तीव्र भावना राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात , तसेच डॉक्टर आणि रुग्णांलयावर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात सहकार्य करावे असे त्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
0 Comments