शिक्षण झाले सुरू ; पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
शिक्षण झाले सुरु ; पहिले पंधरा दिवस होणार उजळणी ; शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार बारामती वार्तापत्र रिपोर्ट राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे 15 जूनला तर विदर्भात 26 जूनपासून सुरु होतात . त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे . विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा . गायकवाड यांनी दिली आहे . शिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या , कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे . गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला . व्हॉट्सअप , युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण देण्यात आले . यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करुन दिले .या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे . यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे . ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले . विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल . असे सांगुन प्रा.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
0 Comments