महावितरणचा झटका; लॉकडाऊन संपला उद्यापासून पुन्हा थकीत वीज बिलाच्या वसूलीचे आदेश
मुंबई /कोरोनामुळे पहिल्या ल़ॉकडाऊनवेळी वीज बिलांची माफी देण्य़ाची आश्वासने आल्याने अव्वाच्या सव्वा आलेली बिले लोकांनी भरली नव्हती. मात्र, तो लॉकडाऊन संपताच त्यांच्याकडून ती वाढीव वीज बिले वसूल करण्यासाठी महावितरणने (MSEDCL) मोठी वसुली मोहिम हाती घेतली होती. आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन संपताच थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरणे (Mahavitaran) उद्यापासून वसुली मोहिम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत या काळात अव्वाच्या सव्वा बिले पाठवून महावितरणने त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले होते. त्यातच सत्ताधाऱ्यांनी वीज बिलमाफीची पुडी सोडल्याने लोकांनीही बिले भरण्यास टाळाटाळ केली होती. महावितरणने अचानक वसुली सुरु करताच राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. याचबरोबर लोकांचाही रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत होता. वसुली करण्यासाठी कधी वीज मीटर बंद तर कधी डीपीच बंद करण्यात आले होते.आता पुन्हा उद्यापासून वसुली सुरु केली जाणार असून दुसऱ्या लॉकडाऊनमध्येदेखील ग्राहकांनी बिले भरली नाहीएत. महावितरणची गेल्या वर्षीपासून मे 2021 पर्यंत 6334 कोटींची बिले थकलेली आहेत. 2020-20 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी आणि मे 2021 मध्ये 1386 कोटी रुपये थकीत आहेत. वीज निर्मिती आणि कर्जावरील व्याजाच्या बोजामुळे महावितरण संकटात सापडली असून वीज बिलांची वसुली गरजेची असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. यामुळे उद्यापासून वसुली सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून वीज बिलांची वसुली सुरु होणार आहे.
0 Comments