महूद / प्रतिनिधी कोरोना संक्रमित व्यक्तीचा तपासणी अहवाल वेळेत मिळाला नाही . त्यामुळे उपचाराअभावी या वयस्कर व्यक्तीने गावातील प्राथमिक शाळेच्या आवारातच प्राण सोडले . मरणानंतरही जवळचा कोणताही नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे न आल्याने स्थानिक ग्रामकृती समितीने रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले . ही घटना सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे
शुक्रवार ( दि . १४ ) रोजी घडली आहे . सुमारे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील पासष्ट वर्षाची वयस्कर व्यक्ती गावांतर्गत असलेल्या देशमुख वस्ती येथे एका शेतकऱ्याकडे कामाला होती . या शेतकऱ्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींना दहा दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनी त्यांना इतर ठिकाणी राहण्यास सांगितले . त्यानंतर ते गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात राहू लागले . त्यावेळी त्यांना खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत होता . म्हणून संबंधित शेतकऱ्याने त्यांना खोकल्यावरचे औषध ही दिले होते . सात मे रोजी लोटेवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर तपासणीकरिता नमुने घेतले . मात्र त्याचा अहवाल गुरुवार ( दि .१३ ) रोजी दुपारी स्थानिक ग्रामकृती समितीला कळविण्यात आला . तब्बल सात दिवस अहवाल प्राप्त झाला नसल्याने त्या वृद्धावर कोणत्याही प्रकारचा उपचार झाला नाही . नातेवाईकांचा आधार नसल्याने सात मे पासून ही व्यक्ती गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात राहत होती . त्यानंतर गावातील इतर काही व्यक्तींनाही कोरोना संसर्ग झाल्याने घरातील इतरांनी त्यांना प्राथमिक शाळेच्या आवारात राहण्यास सांगितले . आर्थिक स्थिती नसल्याने कुटुंबातील बाधित व्यक्तीची जबाबदारी घेण्यास ग्रामीण भागात टाळाटाळ केली जात आहे . त्या वृद्धासह इतर दोघेजण शाळेच्या आवारातच राहत होते . त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने औषधे पुरवण्यात आली होती . सदर वृद्ध कोरोना बाधित असल्याचा अहवाल गुरुवार ( ता .१३ ) रोजी दुपारी लोटेवाडीच्या स्थानिक ग्रामकृती समितीला कळविण्यात आला . तोपर्यंत त्यांची प्रकृती लोटेवाडी येथे सात मे रोजी संशयित रुग्णांच्या तपासणीकरिता नमुने घेण्यात आले होते . त्याचा अहवाल १३ मे रोजी ग्रामकृती समितीला कळविण्यात आला . आर्थिक अडचणीमुळे इतर कोणतीही तपासणी अथवा उपचार घेता न आल्याने सदर वृद्धाचा नाहक बळी गेला आहे . ग्रामीण भागाचे चित्र विदारक होऊ लागल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे . रूपाली लवटे , पं.स. सदस्या खालावली होती . ग्रामकृती समितीने त्याच दिवशी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून शाळेच्या आवारातील रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मागवली . रुग्णवाहिका दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार ( ता .१४ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोटेवाडी येथे आली . तोपर्यंत त्या वृद्धाने शाळेच्या आवारातच प्राण सोडले होते . रुग्णवाहिका इतर दोन पैकी एका रुग्णाला घेऊन गेली . त्यांच्या मृत्यूनंतर जवळचा कोणताही नातेवाईक पुढे न आल्याने ग्रामकृती समितीच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले . डॉ.अविनाश खांडेकर यांनी स्वतः अग्नी दिला . यावेळी सम्राट गडहिरे , दादा जावीर , संतोष लवटे , दादासाहेब लवटे , सरपंच विजय खांडेकर , उपसरपंच दादासाहेब सावंत , पोलीस पाटील सचिन सावंत , धनाजी पाटील , ग्रामसेवक पांडुरंग बुरुंगले हे उपस्थित होते .


0 Comments