मंगळवेढेकरांनो! विनाकारण घरा बाहेर पडाल तर तुमची केली जाणार कोरोना टेस्ट; पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटरला रवानगी
मंगळवेढा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व मंगळवेढा पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १०० जणांची आज कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली.
त्यात पॉझिटिव्ह आलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे
मंगळवेढा शहरातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांच्या संचारावर बंदी आणली आहे
शनिवार, रविवार तर पूर्णपणे विकेंड लॉकडाऊन असतो. असे असतानाही काहीजण विनाकारण बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतो. त्यासाठी मंगळवेढा पोलिसांच्या वतीने दामाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्या १०० नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. तर, पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अत्यावश्यक बाबी सोडता अजिबात बाहेर पडू नये. सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन सर्वच गोष्टीचा तुटवडा आहे.त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी मंगळवेढा पोलीस कोरोना चाचणी करते. कोणाला शिक्षा म्हणून चाचणी केली जात नाही. अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत.पण, ते कोरोना पॉझिटिव्ह असतात. लक्षणे नसल्याने पॉझिटिव्ह असतानाही ते फिरत असतात. सर्वांशी मिसळत असतात. अशा लोकांचे कोरोनाचे लवकर निदान होऊन त्यांना तत्काळ आयोसोलेट करण्यासाठी हा उपक्रम आहे.यामध्ये रँडम टेस्टिंग केल्या जातात. पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते असल्याचे पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे यांनी सांगितले.मंगळवेढा पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे म्हणाले ‘विनामस्क फिरणारे, डबलसीट, वाहतूक नियमांचे उल्लंघन, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या सुमारे २०० जणांवर दंडात्मक कारवाई केली. डबलसीट, आस्थापना , वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे


0 Comments