सोलापूर : संचारबंदीच्या काळात लोकांनी किराणा, भाजीपाला आणि औषधांसाठी घराबाहेर पडू नये. या सर्व सेवा लोकांना घरपोच मिळाव्यात यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे प्रयत्नशील आहेत.
या अनुषंगाने सोमवारी पोलिस आयुक्तालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. भाजीपाला, किराणा दुकानदार आणि मेडिकल चालकांनी यासह सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
लॉकडाउन, संचारबंदी असतानाही अनेकजण किराणा, भाजीपाला आणि औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यावर उपाय म्हणून पोलिस आयुक्त शिंदे यांनी सोमवारी आयुक्तालयात मेडिकल चालक, भाजीपाला, किराणा दुकानदारांसोबत चर्चा केली. शहरात 800 हून अधिक मेडिकल आहेत तर तेराशेहून अधिक किराणा दुकानदार आहेत.सर्व नागरिकांनी आपल्या हद्दीतील किराणा दुकानदार, भाजीवाल्याकडेच जावे. किराणा, भाजीपाला घेण्यासाठी घरापासून दूर वाहन घेऊन जाऊ नये. रस्त्यावरची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. दुकानदार, विक्रेते, व्यापाऱ्यांच्या मदतीने होम डिलिव्हरीवर भर देण्यात येत आहे. शहरात मागणीप्रमाणे किराणा माल, भाजीपाला आणि मेडिकल औषधे पुरवठा करण्याची तयारी असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. घरपोच भाजीपाला, किराणा मिळविण्यासाठी 9765222410 आणि 8624894141 या मोबाईल क्रमांकावर, औषधे घरपोच मिळवण्यासाठी 727728 7277 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी आपल्या घराजवळील किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेत्याकडून माल घ्यावा किंवा आपल्या गरजेनुसार ऑनलाइन मागणी करावी. संचारबंदीच्या काळात होम डिलिव्हरीची सुविधा उत्तम आहे. आपला परिसर सोडून इतर ठिकाणी वाहनावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. भाजी विक्रेत्याकडून परत जाताना रिकाम्या हाताने जाणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनी तसेच शासकीय कार्यालयातील पाच टक्के कर्मचारी वर्गाने आपली ओळखपत्रे सोबत ठेवावीत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- अंकुश शिंदे,
पोलिस आयुक्त
0 Comments