सांगोला नगरपालिकेची येणारी निवडणूक काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांची महाविकास आघाडी करून लढविणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली . आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये या महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाला .
या बैठकीस आ.शहाजीबापू पाटील , माजी आ . दीपकआबा साळुखे - पाटील , प्रा . प्रबुद्धचंद्र झपके , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड आणि माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ आदी उपस्थित होते . राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे . त्याप्रमाणे सांगोला शहरामध्ये या तीनही मित्र पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी तयार करून येणारी नगरपालिका निवडणूक लढवणार आहोत . सांगोला शहराचा अनेक वर्षांपासून रखडलेला विकास अधिक गतिमान करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले . आम्ही काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे तीनही नेते एकत्र आलो आहोत . येणारी निवडणूक एकदिलाने लढवून सांगोलाशहरामध्ये महाविकास आघाडीची सत्ता एकहाती मिळवून शहराचा सर्वांगिण करू . शासनाकडून भरघोस निधी खेचून आणू , असे मा.आ. दीपकआबा साळुखे - पाटील यांनी सांगितले .
0 Comments