google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Breaking ! सरपंच निवड 8 फेब्रुवारीला; तीन दिवसांची नोटीस देऊन चौथ्या दिवशी होणार सरपंच, उपसरपंच निवड

Breaking News

Breaking ! सरपंच निवड 8 फेब्रुवारीला; तीन दिवसांची नोटीस देऊन चौथ्या दिवशी होणार सरपंच, उपसरपंच निवड


राज्यातील 28 हजार 875 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली आहे. 18 जानेवारीला मतमोजणी झाली असून तिथून पुढे 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवड होणे बंधनकारक आहे.


 सोलापूर : राज्यातील 28 हजार 875 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली आहे. 18 जानेवारीला मतमोजणी झाली असून तिथून पुढे 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवड होणे बंधनकारक आहे. राज्यातील बहुतेक सरपंचांची निवड 10 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांची निवड 8 फेब्रुवारीला होणार असून त्यासंबंधीचे आदेश सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) काढले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांकडे त्या प्रवर्गातील सदस्य नाही, खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या संबंधित मागास प्रवर्गातील उमेदवारास सरपंच होण्याची संधी मिळाली, सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतरही विरोधी गटातील मागास प्रवर्गातील सदस्याला सरपंचपदी लॉटरी लागली, असेही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे, सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील दोन- चार सदस्य सत्ताधारी गटाकडे असल्याने सर्वात पहिले सरपंच कोण, असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा नाराज सदस्यांचा अचूक वेध घेऊन विरोधकांनी त्याला थेट सरपंचपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत नेमका कोण आणि कोणत्या गटाचा सरपंच होणार? हे निश्‍चित सांगणे कठीण झाले आहे. 

सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकजण विरोधकांसोबत फिरायला गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांना घेऊन फिरायला गेलेले गटप्रमुख म्हणत आहेत की, प्रशासनाने सरपंच निवड लवकर करावी. 

सदस्य पळवापळवीच्या भीतीने गटप्रमुख सदस्यांसोबत गेले सहलीला 

सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर सदस्य संख्या काठावर असलेल्या गटाने विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवत आपले सदस्य फिरायला नेले आहेत. तर सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे, त्या प्रवर्गातील दोन सदस्य असल्याने एका नाराज सदस्याला विरोधकांनी थेट सरपंचपदाची ऑफर देऊ केली. त्यामुळे अशा सदस्यांना तर गट प्रमुखाने आरक्षण पाहायला गेलेल्या ठिकाणावरून उचललेले आहे. त्याचा सर्व संपर्क गट प्रमुखाच्या मोबाईलवरून सुरू आहे. आता फिरायला गेलेले सदस्य थेट सरपंच निवडीच्या दिवशीच गावात आणले जाणार आहेत, जेणेकरून विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा त्यांना विश्वास आहे. काहीही असो, कोरोनामुळे घरी बसून असलेल्या सदस्यांना या निमित्ताने विविध ठिकाणे पाहायची संधी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांत सरपंच निवड करणे बंधनकारक 

सरपंच निवड होण्यापूर्वी संबंधितांना दिली जाणार तीन दिवसांची नोटीस 

नोटीस देऊन तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी होणार सरपंच निवडीची सभा; अर्ज भरणे, माघार आणि अंतिम निवड त्याच दिवशी होणार 

राज्यातील 14 हजार 234 पैकी बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचांची 8 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार निवड 

सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड एकाच दिवशी; जिल्हाधिकारी म्हणाले, 8 अथवा 9 फेब्रुवारीला होतील सरपंच निवडी, सोमवारी निघेल आदेश 

सरपंच निवड झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपर्यंत पहिली ग्रामसभा घेणे नूतन सरपंच व सदस्यांना असणार बंधनकारक 

Post a Comment

0 Comments