सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर येथील सागर ज्वेलर्समधून चोरट्यांनी १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिने असा जवळपास आठ ते साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा. घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे दत्ताजी साळुखे हे माधवनगर येथील आपले सागर ज्वेलर्स दुकान उघडले. घरातून १५ तोळे सोने आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग त्यांनी दुकानातील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली होती. ते दुकानात साफसफाई करत होते. तितक्यात दोन युवक त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले असल्याचे सांगितले.
त्यामुळे दत्ताजी साळुखे ते पडलेले पैसे शोधण्यासाठी दुकाना बाहेर गेले असता, दुकानात आतील बाजूस ठेवलेली दागिन्यांची पिशवी घेवून दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
ते युवक पळून का गेले, हे पहाता साळुखे यांना दागिन्यांची पिशवी दिसून दिसली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक उमेश चिकणे आणि पोलिस ताफ्याने घटनेची माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असुन दोन्ही चोरट्यांचा शोध सुरू आहे.
0 Comments