सतीश सावंत यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर ?
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीतील कोणाची वर्णी लागते याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली आहे . विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत . त्यामुळे सध्यातरी उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीकडून नगरसेवक सतीश सावंत यांचे नाव आघाडीवर आहे .
सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक - निवडणूक २०१६ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत शहर विकास महायुतीच्या राणी माने या जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या.या निवडणुकीत नगरविकास आघाडी ११ , शहर विकास महायुती ८ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले . आतापर्यंत नगरविकास आघाडीकडून सुरेश माळी , चेतनसिह केदार - सावंत , स्वाती मगर , भामाबाई जाधव यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे . पुढील वर्षी सांगोला नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याने उर्वरित एक वर्षासाठी नगरसेवक सतीश सावंत यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे . नगरविकास आघाडीकडून घटक पक्षांतील सर्वांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी उपनगराध्यक्षपदी निवड केली जाते .
विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांची एक वर्षाची मुदत संपणार असल्याने सध्या उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे . नगरविकास आघाडीकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने हा कालावधी सहा महिन्याचा करावा असेही बोलले जात आहे . माजी आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपकआबा साळुखे - पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार असले तरी यात नगरसेवक सतीश सावंत यांचेच नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे .
पुढील वर्षी नगरपरिषदेची निवडणूक होणार असल्याने निदान शेवटच्या टर्ममध्ये तर उपनगराध्यक्षपद मिळावे ही सुप्त इच्छा असली तरी श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे . आता नाही तर पुन्हा कधीच नाही यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे . श्रेष्ठीनी इच्छुकांशी बंद खोलीत सल्लामसलत करून शब्द दिला असल्याची चर्चा असली तरी ऐनवेळी काय होते हे पाहणे औत्सुक्याचे आहे .
0 Comments