सांगोल्यातील 61 " मिनी मंत्रालयां'च्या निवडणूक मोर्चेबांधणीला येतोय वेग !ंसांगोला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे . " मिनी मंत्रालय ' म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावपातळीवरील स्थानिक पुढाऱ्यांपासून विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी गावावर कब्जा मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत सांगोला
( सोलापूर ) : सांगोला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे . " मिनी मंत्रालय ' म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावपातळीवरील स्थानिक पुढाऱ्यांपासून विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी गावावर कब्जा मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत . या निवडणुकांसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याने मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमुळे गाव पातळीवरील पक्षीय युती , आघाड्या व पॅनेल बनवण्यासाठी राजकारण ढवळून निघण्यास सुरवात होणार आहे . राज्य सरकारने कोरोना महामारीमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करून निवडणुका पुढे ढकलल्या होत्या . सध्या ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाल्याने या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे . सांगोला तालुक्यात 61 ग्रामपंचायतींची मुदत जुलैमध्ये संपली होती . मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून गाव कारभार प्रशासकाच्या हाती दिला होता . मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्याने दिवाळीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे फटाके फुटले जाण्याची शक्यता आहे . डिसेंबर महिन्यात 45 ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने एकूण 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रितच होतील . विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे . तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींपैकी 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजणार असल्याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी या निवडणुकांमधून होणार आहे . :तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात इतर विविध पक्ष एकत्रित आले होते . ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाबरोबरच प्रभाग रचनेनुसार भाव - भावकी , स्थानिक पक्षविरहित आघाड्या , जातीच्या समीकरणानुसार आघाड्या - युत्या केल्या जातात . परंतु सध्या तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकांपासून राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याने तालुका स्तरावरील नेते मंडळींप्रमाणे स्थानिक गाव पुढारीही एकत्रित येतील का , याकडेच लक्ष लागले आहे . ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत कोणत्या पक्षाच्या आघाड्या होणार , याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण वाटत असले तरी गावपातळीवरील स्थानिक राजकारणाचा प्रभाव अधिक दिसून येत असतो . ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाला असला तरी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . सरपंचपदाच्या सोडतीनंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येणार आहे . सध्या तरी प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या आरक्षणाप्रमाणेच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून :बसले आहेत . सांगोला तालुक्यातील आलेगाव , आगलावेवाडी , बामणी , चोपडी , देवळे , एखतपूर , गायगव्हाण , हलदहिवडी , महीम , मेडशिंगी , नाझरे , निजामपूर , संगेवाडी , सोमेवाडी , तरंगेवाडी , वासूद या 16 ग्रामपंचायतींची मुदत जुलै महिन्यात संपली आहे . तर डिसेंबर महिन्यात अचकदाणी , बुरंगेवाडी , भोपसेवाडी , डिकसळ , डोंगरगाव , धायटी , कमलापूर , खिलारवाडी , मांजरी , शिरभावी , वझरे , वाटंबरे , अजनाळे , बुद्धेहाळ , हणमंतगाव , इटकी , हंगिरगे , जुनोनी , जुजारपूर , लोणविरे , मानेगाव , मेथवडे , वाणीचिंचाळे , वाकी - घेरडी , अकोला , गौडवाडी , हातीद , हटकर मंगेवाडी , जवळा , कटफळ , महूद , पाचेगाव बु , राजुरी , तिप्पेहाळी , उदनवाडी , वाकी - शिवणे , घेरडी , कडलास , किडबिसरी , कोळे , लक्ष्मीनगर , लोटेवाडी , नराळे , पारे , य . मंगेवाडी या 45 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे . विधानसभेप्रमाणे गावपातळीवर युती होणार का ? विधानसभा निवडणुकीवेळी तालुक्यातील मातब्बर नेतेमंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात एकत्रित आले होते . या निवडणुकीप्रमाणे गावपातळीवर :सुद्धा आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत आघाड्या होणार का ? पक्षीय राजकारणाला नवी दिशा मिळणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे . संपादन : श्रीनिवास दुध्याल
0 Comments