सांगोल्यात गुटख्याविरोधात धडक कारवाई; जप्त मुद्देमाल कडलास रोडवरील कचरा डेपोमध्ये नष्ट
सांगोला / प्रतिनिधी : प्रतिबंधित गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन
आणि सांगोला पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला आणखी एक महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला गुटखा व संबंधित मुद्देमाल बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी कडलास रोड येथील कचरा डेपो परिसरात नियमानुसार नष्ट करण्यात आला.
सांगोला शहर व परिसरात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या कारवाईवेळी अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, मंगेश लवटे तसेच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भातुकडे यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांनी अशा पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.
गुटख्याचा जप्त साठा नष्ट करण्याच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यवसायाला आळा घालण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला बळ मिळाले असून,
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे


0 Comments