दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राजापूर-बुरलेवाडीत दुष्काळी परिस्थितीची पाहणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती
पिकांचे नुकसान, पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश
सांगोला | प्रतिनिधी, सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात
घेऊन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राजापूर आणि बुरलेवाडी येथे प्रत्यक्ष भेट देत शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पाहणीदरम्यान कृषिमंत्री भरणे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी
पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य आर्थिक नुकसान याबाबत त्यांनी माहिती घेतली.
पीक नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे सांगत,
प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
राज्यात पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर
पावसातील खंडामुळे राज्यातील सुमारे एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री भरणे यांनी दिली.
यापैकी सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून,
उर्वरित पंचनाम्यांचे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून नियमांनुसार मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यात ९५ टक्के पंचनामे पूर्ण
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाकडूनही पाहणी सुरू आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न
या दौऱ्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि शेतीच्या नुकसानीची वस्तुस्थिती कृषिमंत्र्यांसमोर मांडली.
खरीप पिकांसह अन्य पिकांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया गतीने राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था, पाण्याची कमतरता आणि शेतीसमोरील विविध अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.
संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेत भरणे यांनी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत,
प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान निश्चित करून त्यांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळावी,
तसेच पाणी आणि चाऱ्याची संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, हा या पाहणी दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.


0 Comments