उदनवाडीत आलदर हॉस्पिटलचा आरोग्यसेवेचा उपक्रम ५० हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी; गरजू रुग्णांना औषधांचे वाटप
सांगोला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील बालकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने सांगोला येथील आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उदनवाडी येथे झालेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात ५० हून अधिक विद्यार्थ्यांसह जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
आलदर हॉस्पिटलचे डॉ. महावीर आलदर (एम.डी., बालरोग तज्ज्ञ) यांनी बालकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले.
बालकांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे, आजारांची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे याबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले.
या उपक्रमास धनंजय धबधबे, अर्चना धबधबे, दिनकर गाडे सर, विकास वलेकर, दिलखुश आलदर, सुहास माळी, सुनील बुरुंगे, डॉ. पवन शिरसाट, रुपाली बुरुंगे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासोबतच बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे
आणि शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.



0 Comments