Breaking News

अकलूजमध्ये २५ लाखांच्या लाच मागणीचा धक्कादायक प्रकार; ‘वाघ’ पसार, ‘आबा’ रंगेहाथ

अकलूजमध्ये २५ लाखांच्या लाच मागणीचा धक्कादायक प्रकार; ‘वाघ’ पसार, ‘आबा’ रंगेहाथ


डीवायएसपींच्या नावाने लाच मागितल्याचा आरोप; दोन खासगी दलालांना ५.५० लाख स्वीकारताना एसीबीने पकडले, दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा

अकलूज / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी आणि काही गंभीर कलमे लागू न करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 या प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन खासगी व्यक्तींना ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून, दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी साडेअडीचच्या सुमारास माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आबा सावळा वळकुंदे (४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) अशी कारवाईत पकडलेल्या खासगी व्यक्तींची नावे आहेत. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे (ब. नं. १६५९, नेमणूक नातेपुते पोलिस ठाणे, सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज) 

आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ (माळशिरस पोलिस ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही हवालदार पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

२५ लाखांची मागणी केल्याचा आरोप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल

 न करण्यासाठी पोलिस हवालदार अनिल शिंदे यांनी स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिंदे यांनी खासगी व्यक्ती आबा वळकुंदे यांच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देणे तसेच ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यातील कलम लागू न करण्यासाठी डीवायएसपी संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख रुपये आणि काम झाल्यानंतर स्वतःसाठी आणखी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.

५.५० लाखांच्या सापळ्यात दलाल जाळ्यात

दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी तसेच बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी डीवायएसपी संतोष वाळके यांच्या नावाने ५ लाख रुपये, 

तर पोलिस हवालदार राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोघांना पकडण्यात आले.

या कारवाईनंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या नावाचा वापर करून लाच मागण्यात आली की संबंधितांची प्रत्यक्ष भूमिका काय होती, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे. या प्रकरणातील पसार असलेल्या दोन्ही पोलिस हवालदारांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, लाच मागणीमध्ये डीवायएसपी संतोष वाळके यांची नेमकी भूमिका काय होती, याबाबत तपासातूनच स्पष्टता होणार आहे. केवळ त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने त्यांचा सहभाग सिद्ध होत नाही.

Post a Comment

0 Comments