NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा स्फोट! लातूरच्या नामांकित प्राध्यापकाला CBI ने घेतले ताब्यात
लातूर | प्रतिनिधी देशभरात गाजत असलेल्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे
संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा तपास वेगाने सुरू असताना CBI चे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे विशेष पथक लातूरमध्ये दाखल झाले होते.
या पथकाने मोटेगावकर यांची जवळपास 8 ते 10 तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याने अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
पुण्यातील आरोपीकडून उघड झाले धागेदोरे
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचे नाव पुढे आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर CBI ने थेट लातूरमध्ये कारवाई करत चौकशीची चक्रे वेगाने फिरवली.
‘42 प्रश्न जसेच्या तसे’ आल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणात एका पालकाने गंभीर तक्रार दाखल केली होती. मोटेगावकर यांच्या संस्थेने घेतलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न NEET च्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे
आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पेपरफुटीचे धागेदोरे अधिक खोलवर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिल्ली कोर्टात हजर करण्याची तयारी
CBI कडून आता मोटेगावकर यांना दिल्ली न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
‘लातूर पॅटर्न’वरही प्रश्नचिन्ह
वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘लातूर पॅटर्न’ची प्रतिमा या घटनेमुळे धुळीस मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून NEET परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


0 Comments