दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! आज दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे.
राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे.
निकाल कसा आणि कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक्स:
१. results.digilocker.gov.in
२. mahahsscboard.in
३. sscresult.mkcl.org
४. results.targetpublications.org
५. results.navneet.com
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची प्रत
निकाल जाहीर झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठीची प्रक्रिया निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होईल.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा पीडीएफ सेव्ह करा. ही प्रत तात्पुरत्या प्रवेशासाठी उपयोगी ठरते.
निकाल जाहीर होताच एकाच वेळी अनेक युजर्स वेबसाईटवर आल्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी घाबरून न जाता थोड्या वेळाने प्रयत्न करावा.
यंदा डिजीलॉकरवरही निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीट सहज मिळवता येईल.
जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट मध्ये पुनर्परीक्षा घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.


0 Comments