धक्कादायक! “अर्ध्या तासात येतो” म्हणत घराबाहेर पडलेला जिम ट्रेनर 14 दिवसांनी मृतावस्थेत सापडला; सोलापूर हादरलं
सोलापूर: शहरातील विजापूर नाका परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध जिम ट्रेनर सचिन मच्छिंद्र माने (वय 30)
यांचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता असलेला सचिन अखेर मृत अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी सचिन माने हे पत्नी कल्याणी यांना “अर्ध्या तासात येतो” असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते बेपत्ता झाले.
कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच सुगावा लागला नाही. अखेर याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, 27 मार्च रोजी सैफुल परिसरात आधार हॉस्पिटलपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झुडपात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सचिन यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
प्लास्टिक पाइपने गळफास; दुचाकीही घटनास्थळीच
घटनास्थळी तपास करताना बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पाइपने गळफास घेतल्याचे आढळून आले. तसेच, त्यांची दुचाकीही त्याच परिसरात उभी होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
खून की आत्महत्या? पोलिसांचा दुहेरी तपास सुरू
प्राथमिक तपासात हा प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांनी आत्महत्येसोबतच खुनाच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सचिन माने यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.


0 Comments