सांगोल्यात पानमसाला-तंबाखूचा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..
सांगोला ता. ३१ : राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूविरोधात
अन्न व औषध प्रशासनाने सांगोल्यात मोठी धडक कारवाई केली आहे.३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा ते सायंकाळी
साडेचार या कालावधीत मस्के कॉलनी, एखतपूर रोड परिसरात वाहन,
पानटपरी आणि गोदामावर छापा टाकून सुमारे २४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहायक आयुक्त (अन्न) कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अनिल मस्के यांच्या घराजवळ
उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ग्रे रंगाच्या एमएच १२/डीवाय ९३९१ या क्रमांकाच्या
वाहनात मोठ्या प्रमाणावर पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तर दुसरे वाहन रिकामे होते.
सदर वाहनातून ४ लाख ३ हजार १६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला
असून वाहनाची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे. वाहनाच्या आरसीनुसार मालकी अक्षय अनिल मस्के यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पंचासमक्ष नमुने वेगळे करून उर्वरित साठा जप्त करण्यात आला. यानंतर मस्के यांच्या घरासमोरील हातगाडी स्वरूपाच्या पानटपरीची तपासणी केली
असता तेथेही ४० हजार ५९६ रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला.
यानंतर एफडीए व पोलिस पथकाने सांगोला रेल्वे गेटजवळील अनिल मस्के यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकला.
कुलूप तोडून गोडाऊन उघडताच आतून सुगंधित तंबाखू व सुपारीचा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती गोडाऊनमध्ये ९ लाख ७४ हजार ३८० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला,
तंबाखू व सुगंधित सुपारीचा साठा मिळून आला. सदर गोडाऊन पुढील वापर टाळण्यासाठी सील करण्यात आले आहे.
या संपूर्ण कारवाईत एकूण २४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
असून चारचाकी वाहन, पानटपरी व गोडाऊन सांगोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या प्रकरणी अनिल रामचंद्र मस्के व अक्षय अनिल मस्के (रा. मस्के कॉलनी, सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments