मोठी बातमी..आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीमुळे एमपीएससी मध्ये 182 जागा वाढल्या
आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश एमपीएससी मध्ये 182 नव्या जागांचा समावेश
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2025 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील
Assistant Engineer Grade-II (Civil) पदांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने राज्यभरातील हजारो अभियंता उमेदवारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर आणि तरुणांच्या भवितव्याशी निगडित प्रश्नाची दखल घेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि ठोस पाठपुरावा केला.
या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागातील वास्तविक रिक्त पदांचा आढावा घेऊन, तातडीने जागा वाढवाव्यात, अशी स्पष्ट मागणी आमदार देशमुख यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत
संबंधित यंत्रणेला तात्काळ निर्देश दिले. त्यानुसार नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये Class-II मधील तब्बल 182 अतिरिक्त जागांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून गुणवंत आणि पात्र उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने विकासकामांना गती मिळणार आहे.
यासंदर्भात आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले,
“राज्यातील तरुण अभियंते प्रामाणिकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, कमी जागांमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता. हा प्रश्न केवळ नोकरीचा नव्हता, तर तरुणांच्या भवितव्याचा होता.
त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मांडला. त्यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेत 182 जागांची वाढ केली. याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. पुढेही तरुणांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी माझा लढा सुरूच राहील.”
या निर्णयामुळे केवळ उमेदवारांनाच नव्हे, तर राज्याच्या विकास प्रक्रियेलाही गती मिळणार आहे. अधिक अभियंते उपलब्ध झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील तांत्रिक कामकाजाची गुणवत्ता आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.
राज्यभरातील एमपीएससी उमेदवारांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या या भूमिकेचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत.
अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारेही आनंद व्यक्त केला असून हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे म्हटले आहे.


0 Comments