सांगोला 'माण नदीत बुडून सावेतील तरुणाचा मृत्यू'; अचानक
पुलाच्या कठड्यावरून खाली उडी, नेमकं काय घडलं..
सांगोला : सांगोला तालुक्यातील सावे येथील एक तरुण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. बंडू आत्माराम गावडे
(वय ३५, रा. गावडे वस्ती, सावे, ता. सांगोला) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी माण नदीपात्रात गावडे वस्ती, सावे (ता. सांगोला) येथे घडली आहे.
अंकुश आत्माराम गावडे (रा. सावे, ता. सांगोला) यांनी दिलेल्या खबरीनुसार, बंडू गावडे (रा. गावडे वस्ती, सावे, ता. सांगोला) हा युवक मंगळवारी पहाटे सांगोला येथे आला होता.
त्याचा भाऊ अंकुश गावडे याला त्याने फोन करून सांगोल्यात येण्यासाठी बोलावले. अंकुश गावडे सांगोला येथे आल्यावर त्याला बंडू एसटी स्टँड येथे भेटला.
त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. यानंतर दोघे दुचाकीवरून सावे गावच्या दिशेने निघाले. सकाळी साडेसातच्या सुमारास कोपटेवस्ती येथील माण नदी पुलावर आल्यानंतर बंडूने लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अचानक पुलाच्या कठड्यावरून खाली उडी घेतली.
तो थोडा वेळ पाण्यात पोहत गेला, मात्र काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहात बुडाला. घटनेनंतर बंडू गावडे यास पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत असल्याचे घोषित केले.


0 Comments