राजकारणातील दोन्ही आबासाहेब...! (अंतर्मुख होऊन अभ्यास करण्याची गरज)
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगली आणि सोलापूरच्या मातीने दोन अद्वितीय नेते दिले. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख आणि आर.आर. (आबासाहेब) पाटील. दोघेही वेगवेगळ्या पिढ्यांचे,
पण विचारांची मुळे एकच..जनतेशी नाळ जोडलेली, सत्तेचा वापर समाज कारणासाठी आणि राजकारणाचा वापर सेवेसाठी ! आजच्या राजकीय वातावरणात जेव्हा पद, पैसा आणि प्रसिद्धी यांना प्राधान्य मिळतं,
तेव्हा या दोन्ही आबासाहेबांचा विचार म्हणजे आरशात स्वतःकडे पाहण्यासारखा आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी अर्धशतकाहून अधिक काळ जनतेच्या विश्वासावर निवडणुका जिंकल्या, पण सत्तेचा माज कधीच चढू दिला नाही.
तर आर.आर. पाटील उपमुख्यमंत्री असतानाही तळागाळातील शेतकऱ्यांसोबत मातीवर बसून गप्पा मारायचे.दोघांनी दाखवून दिलं...सत्ता टिकवायची असेल, तर माणूस टिकवावा लागतो. आजच राजकारण वेश्याव्यवसायापेक्षाही मलिन झालं आहे.
पण दोन्ही आबासाहेबांसाठी ते धर्म होतं. भ्रष्टाचार, लोभ, आणि तडजोड यांना त्यांनी तुच्छ मानलं. भाई गणपतरावांचं आयुष्य म्हणजे सदाचाराचा प्रवास. त्यांच्याकडे सत्ता नव्हती,
पण समाजावरचा प्रभाव सत्ताधाऱ्यांपेक्षा मोठा होता. दोघेही जनतेशी संवाद करत. फाईलमध्ये नव्हे, फार्मवर; सभागृहात नव्हे, गावात; आणि मनात कायम !
आजचा नेता सोशल मीडियावर लाईक्स गोळा करतो, पण आबासाहेबांनी मनं गोळा केली.
त्यांचा प्रत्येक संवाद होता भावना, प्रत्येक निर्णय संवेदना,आणि प्रत्येक कृती सेवा.
भाई गणपतराव म्हणायचे विकास म्हणजे माणसाचा सन्मान वाढवणं.तर आर.आर. पाटील यांनी दाखवून दिलं.विकास म्हणजे सुरक्षित समाज घडवणं.
ग्रामीण भागातील युवकांनी पैशाचा आधार न घेता मेरीटवर नोकरी मिळवावी .. हीच त्यांची खरी विकासदृष्टी होती. आजचे नेते जर आकड्यांत नव्हे, तर त्यांच्या कार्यात विकास शोधतील,
तर तो अनुभवाच्या रूपात सापडेल. दोन्ही नेत्यांच्या पोशाखात साधेपणा, भाषणात प्रांजळपणा आणि वर्तनात नम्रता होती. आज जेव्हा राजकारणात इमेज बिल्डिंगचा कोलाहल आहे, तेव्हा त्यांच्या साधेपणाचा आवाज सर्वात प्रभावी ठरतो.
आजच्या पिढीतील राजकारण्यांनी त्यांच्या जीवनशैलीचा, कार्यपद्धतीचा आणि निर्णयप्रक्रियेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण खरी ताकद खुर्चीत नसते..ती माणसांच्या मनात असते.
दोन्ही आबासाहेब गेले, पण त्यांच्या विचारांची ज्योत अजूनही तेवत आहे. नेते, कार्यकर्ते आणि विद्यार्थी जर त्यांच्याकडून एक धडा घेतला तरी समाजाचं राजकारण अधिक शुद्ध, सजग आणि संवेदनशील होईल.नेतृत्व हे पद नसतं... ते परंपरेतून घडलेलं कर्तृत्व असतं.
शेवटी, विकास कसा करायचा हे दोन्ही आबासाहेबांकडूनच शिकावं.दोघांचाही जन्म दुष्काळी भागात झाला, पण त्यांनी तो भाग पाणीदार करून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला.
त्यांच्या आठवणी आजही डोळ्यांत ओल आणतात... आणि अंतर्मनात विचार जागवतात ... नेतृत्वाचा अर्थ सत्ता नव्हे, संवेदना आहे.
प्रा. आनंदा आलदर


0 Comments