google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...आटपाडी-सांगोला मार्गावरील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीत दुचाकी सह सांगोला तालुक्यातील तरुण वाहून गेला

Breaking News

खळबळजनक...आटपाडी-सांगोला मार्गावरील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीत दुचाकी सह सांगोला तालुक्यातील तरुण वाहून गेला

खळबळजनक...आटपाडी-सांगोला मार्गावरील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीत दुचाकी सह सांगोला तालुक्यातील  तरुण वाहून गेला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 आटपाडी-सांगोला मार्गावरील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीच्या पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेला आकाश जरे (वय २५, रा. खवासपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधानंतर अखेर बोंबेवाडी बंधाऱ्यात सापडला.

सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे माणगंगा नदीला मोठा पूर आला आहे. परिणामी अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. 

सोमवारी दुपारी आकाश जरे आपल्या मित्रासह दुचाकीवरून आटपाडीकडून पिंपरी खुर्दकडे जात होता. त्यावेळी नदीवरील पुलावर जोरदार प्रवाहात पाणी वाहत होते. 

तरीही दोघांनी पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार लाटांमुळे दुचाकीचा तोल सुटला. मागे बसलेला मित्र कसाबसा पाण्यातून बाहेर पडला, परंतु आकाश प्रवाहासह वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शितल बंडगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बिशेंद्रसिंह बायस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासन, पोलिस व स्थानिक नागरिकांच्या 

मदतीने पिंपरी खुर्द ते बोंबेवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू राहिला, परंतु मृतदेहाचा मागमूस लागला नव्हता.

मंगळवारी दिवसभर तासगाव येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधकार्य सुरू ठेवले, मात्र काहीच यश आले नाही. अखेर मंगळवारी दुपारी बोंबेवाडी बंधाऱ्यातील पाणी सोडल्यानंतर आकाशचा मृतदेह आढळला. 

गेल्या काही दिवसांपासून माणगंगा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे पिंपरी खुर्द, कौठुळी आणि खानजोडवाडी परिसरातील पूल पाण्याखाली गेले आहेत.

 अशा परिस्थितीत पुलावरून वाहणारे पाणी ओलांडण्याचा प्रयत्न आकाशच्या जीवावर बेतला. या दुर्दैवी घटनेमुळे खवासपूर आणि पिंपरी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments