google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “सेंद्रिय परसबाग – आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली” : सौ. जयमालाताई गायकवाड

Breaking News

“सेंद्रिय परसबाग – आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली” : सौ. जयमालाताई गायकवाड

“सेंद्रिय परसबाग – आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली” : सौ. जयमालाताई गायकवाड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जवळा, ता. सांगोला, दि. १३ ऑक्टोबर (वार्ताहर) — “महिलांच्या हातात समाज परिवर्तनाची ताकद आहे. घरच्या घरी सेंद्रिय परसबाग विकसित करून महिलांनी स्वावलंबन, 

आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही गोष्टी साध्य करू शकतात,” असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड यांनी केले.

जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने “सेंद्रिय परसबाग – आरोग्यदायी जीवनाची सुरुवात” या विषयावर जवळा व परिसरातील महिलांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

 महिलांच्या दैनंदिन जीवनात सेंद्रिय शेती, आरोग्यवर्धक आहार आणि घरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन या संकल्पनांची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोल्हापूर गार्डन क्लबच्या सदस्या डॉ. प्रमिला बत्ताशी, चित्रा देशपांडे आणि रश्मी भूमकर या तज्ज्ञांनी महिलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सरपंच श्री. सज्जन माघाडे यांनी केले.

 प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड आणि सौ. चारुशीला काटकर उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अनुराधा गायकवाड होत्या.

या प्रशिक्षणादरम्यान डॉ. प्रमिला बत्ताशी यांनी “घरच्या घरी उपलब्ध झाडे, फुले, औषधी वनस्पती व परसबागेत उगवणाऱ्या फुलांचा उपयोग करून नैसर्गिक सरबत, हर्बल ड्रिंक, आरोग्यदायी पेये आणि मसाले तयार करण्याच्या पद्धती” महिलांसमोर सादर केल्या.

त्यांनी सांगितले की, “घरातच नैसर्गिक घटकांपासून बनवलेले पेय आरोग्यासाठी लाभदायक असून, त्यातून घरगुती बचत आणि स्वावलंबनही साध्य होते.”

चित्रा देशपांडे यांनी “कमी जागेत परसबाग कशी फुलवावी, कुंड्यांमध्ये व टाकाऊ वस्तूंच्या सहाय्याने भाज्या, फळे, फुले कशी लावावीत आणि रासायनिक खते न वापरता सेंद्रिय शेतीची संकल्पना घराघरात कशी रुजवावी” यावर सखोल मार्गदर्शन केले.

तर सौ. रश्मी भूमकर यांनी “स्वयंपाकघरातील ओला कचरा, फळभाज्यांच्या साली, देठे व इतर सेंद्रिय अवशेष यांचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती” महिलांना शिकविल्या.

त्यांनी “शून्य कचरा घर” ही संकल्पना मांडत महिलांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

 आरोग्य, पर्यावरण आणि आत्मनिर्भरतेचा संगम

आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. जयमालाताई गायकवाड म्हणाल्या की,आज परसबाग ही केवळ शोभेची वस्तू नसून ती आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि

 महिलांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा केंद्रबिंदू ठरू शकते. घराघरात सेंद्रिय शेतीचा पाया रचला, तर आपल्या समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही सुदृढ राहील.”

त्यांनी पुढे सांगितले की, “महिलांनी या प्रशिक्षणातून घेतलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून प्रत्येक घर हिरवेगार करावे, हीच खरी समाजसेवा ठरेल.

कार्यक्रमास उपसरपंच श्री. नवाज खलिफा, माजी सरपंच सौ. सुषमाताई घुले, ग्रामविकास अधिकारी श्री. दत्तात्रय रसाळ, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट सदस्य, ग्रामसंघाच्या महिला पदाधिकारी .

महिलांचा उत्साह, सहभाग आणि शिकण्याची जिज्ञासा विशेष उल्लेखनीय होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभा पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सौ. अर्चना सावंत यांनी केले.

प्रशिक्षणानंतर उपस्थित महिलांनी “आपल्या घरात सेंद्रिय परसबाग उभारण्याचा संकल्प” घेतला आणि ग्रामपंचायतीने अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments