खळबळजनक..आठ महिने फरार असलेला आरोपी पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश;
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी; काय आहे प्रकरण?
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील फिल्टर पाणी तयार करण्याच्या कंपनीचे गेट तोडून कंपनीमधील मशिनरी घेवून जात असताना यातील आरोपी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख (रा.पाटकूल ता.मोहोळ)
व अन्य आरोपींनी एकास मारहाण करुन एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गेली आठ महिने फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात मंगळवेढा पोलीसांना यश आले आहे.
दरम्यान पोलीसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बाबूराव बर्गे (वय ३३ रा.लक्ष्मी दहिवडी) यांचा पाणी फिल्टरचा व्यवसाय आहे. दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पॅकबंद बाटली बॉक्स विक्रीसाठी वाहनात भरुन फिर्यादी हे सांगोला येथे आले होते.
दुपारी २ वाजता फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर फिर्यादीची पत्नी अश्विनी हिचा कॉल आला. एका चार चाकी वाहनामध्ये काही लोक तसेच नणंद राधीका तिचा नवरा किरण जाधव येवून कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून कंपनीतील मशिनरी घेवून जात आहेत.
तुम्ही लवकर या असे कळविल्यावर फिर्यादी हे मित्राची मोटर सायकल घेवून दहिवडी येथे आले. त्यावेळी आरोपी प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख, किरण उध्दव जाधव,
राधीका किरण जाधव, दत्ता पवार, जकाप्पा उर्फ भैय्या शेजाळ असे घटनास्थळी असल्याचे फिर्यादीस दिसले.
यावेळी आरोपीने तू मला ओळखत नाही का? सोलापूर जिल्ह्यातील लोक घाबरतात, मी बऱ्याचजणांना कामाला लावले आहे,
तु माझे ऐकत नाही का? ही कंपनी राधीका जाधवला का देत नाही? असे म्हणून लोखंडी पाईपने फिर्यादीस पाठीवर पायावर मारुन गंभीर जखमी केले.
यावेळी फिर्यादीस वाचविण्यासाठी त्याची पत्नी मध्ये आल्यावर आरोपी राधीका जाधव हिने तिचे केस ओढून मारहाण केली व इतर आरोपींनी तिच्या अंगास हात लावून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपी हे फरार झाले होते. मागील दोन दिवसापुर्वी आरोपी मोहोळ शहरात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळताच
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, डी. वाय.एस.पी.डॉ. बसवराज शिवपुजे, पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली
तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर, पोलीस अंमलदार महिपती कांबळे, पोलीस अंमलदार प्रेम दिवसे आदींनी मोहोळ शहरात एका ठिकाणी रात्रीच्या वेळी छापा टाकून फरार आरोपी प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख याला ताब्यात घेतले.
तब्बल आठ महिने आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. आरोपीला अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.१८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


0 Comments