खळबळजनक..बाईचा नाद करू नको सांगणाऱ्या काकावर पुतण्याचा चाकू हल्ला,मध्ये आडवे आलेल्या काकूलाही भोसकले, पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात खळबळ
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत त्यामुळे शहरांमध्ये पोलीस प्रशासनाचा धाक राहिला आहे नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
तुळजापूर येथील एका नर्तिकेचे प्रकरण ताजे असतानाच आता पंढरपूर मध्ये ही एक मोठी घटना घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बाईचा नाद करू नको असे सांगणाऱ्या काकावर पुतण्याने चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांचे भांडण सोडवण्यास आलेल्या काकूवर देखील चाकूने वार केल्याची घटना
शहरातील महाद्वार चौकात घडली असून या घटनेमुळे मंदिर परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.कदाचित कॉरिडरच्या पैश्याच्या संदर्भात ही घटना घडली असावी अशी चर्चा मात्र या भागात रंगली आहे.
या प्रकरणी प्रशांत पांडुरंग सूर्यवंशी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमध्ये त्याचे काका ज्ञानेश्वर सूर्यवंशी व काकू अनिता हे जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की,ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांचे महाद्वार चौकात कुंकवाचे दुकान आहे. ज्ञानेश्वर यांचे मोठे भाऊ पांडुरंग वसंतराव सूर्यवंशी हे मयत असून त्यांची पत्नी व दोन विवाहित मुले असे एकत्र राहतात.
दरम्यान प्रशांत सूर्यवंशी याचा विवाह झाला असून देखील त्याचे विवाहबाह्य संबंध होते. यावरून काका व पुतण्या यांच्यामध्ये सतत वाद होत असे.
मंगळवार 23 रोजी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी प्रशांत यास तू बाईचा नाद सोड व नीट रहा असा सल्ला दिला. जर बाईचा नाद सोडला नाही तर तू आमच्या घरात राहू नको बाहेर कोठेतरी जा असे रागाने सांगितले.
यामुळे संतापलेल्या प्रशांतने बुधवार 24 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोपलेल्या काकाच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यांचे ओरडणे ऐकून धावत
आलेल्या अनिता सूर्यवंशी यांच्यावर देखील प्रशांतने चाकूने गळ्यावर वार केला. यामध्ये ज्ञानेश्वर सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहेत. या दोघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कॉरिडोर तसेच संपत्तीच्या वादातूनही हा प्रकार घडला असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे याबाबत मात्र कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


0 Comments