सोलारवर चालणारे राज्यातील पहिले डेटा सेंटर उभारणार;
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख; सांगोला तालुक्यात एमआयडीसीसाठी पाठपुरावा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर: सांगोला तालुक्यात तरुणांच्या हातांना रोजगार देण्यासाठी तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मागणी केली आहे. याशिवाय तालुक्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून, सोलारवर उभारणारे हे राज्यातील पहिले डेटा सेंटर असणार आहे.
१२ गावे अद्याप टेंभू-म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत. नीरा उजवा कालव्यापासून तालुक्यातील काही गावांना पाणी मिळत नाही, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगोला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
आमदारांची विकासदृष्टी या उपक्रमात आमदार देशमुख यांनी 'सकाळ'च्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगोला मतदारसंघाच्या विकासाचे नियोजन सांगितले. सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. देशमुख म्हणाले, सांगोला शहरासह तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मांडणे, त्यासाठी निधी आणणे आणि लोकांचे प्रश्न सोडविण्यावरच अधिक भर आहे. छावणीचालकांचे ३२ कोटी शासनाकडे पाच वर्षे थकीत आहेत,
इतर तालुक्यातील छावणीचालकांचा निधी मिळाला पण सांगोला तालुक्यातील लोकांचे पैसे राहिले आहेत. सांगोला शहरातील भूमिगत गटाराचे काम रखडले होते, त्यासाठी निधी मंजूर करून आणला.
माण, कोरडा नदीस कॅनॉलचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. नदीवर २ टीएमसी बंधारे बांधावेत, आरोग्य केंद्रांना डॉक्टर आहेत, परिचर नाहीत, जिथे परिचर आहेत तिथे डॉक्टर नाहीत या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.
तरुणांचे स्थलांतर, शेतकऱ्यांच्या मालावर अन्नप्रक्रिया, फळप्रक्रिया उद्योग कसे वाढवता येतील याचाही प्रयत्न सुरू आहे.
तालुक्यात ८ ते ९ लाखांचे दूधसंकलन सुरू असून, दूधप्रक्रिया उद्योग आणता येईल का? याचे नियोजन सुरू आहे. तालुक्यात ६० वर्षांवरील अँजिओग्राफी, बायपास मोफत केले जात आहेत.
मतदारसंघातील प्रश्न मांडले
विधानसभा सभागृहात पहिल्यांदा निवडून आलेले आम्ही ७८ आमदार आहोत. यापैकी ८ ते १० जण ठरवून बसायचो, रात्री ११ तर कधी त्यानंतर प्रश्न मांडण्यास संधी मिळायची.
मिळेत त्या वेळेत मतदारसंघातील प्रश्न सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. इतर वेळेत ग्रंथालयात जाऊन स्व. आबासाहेबांची (गणपतराव देशमुख) भाषणे वाचायचो.
...पण विचाराशी एकनिष्ठच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेऊन चौकशी केली. फडणवीस १९९९ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आबासाहेबांकडून मार्गदर्शन घ्यायचे.
त्यांच्या पिढीतील, त्यांचा नातू जो डॉक्टर आहे, पण आमदार झाला आहे, ते जाणून घेण्यासाठी भेट घेतली. पण मी मात्र विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतो.


0 Comments