ब्रेकिंग न्यूज...'योगेवाडीजवळ अपघातात सांगोला तालुक्यातील दोन ठार,
तिघे जखमी'; चारचाकी वाहन-टेम्पो यांच्यात जोरदार धडक,नेमकं काय घडलं
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
तासगाव-कवठेमहांकाळ रस्त्यावर योगेवाडी गावानजीक चारचाकी वाहन आणि मालवाहू टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार,
तर तीनजण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात सोपान मारुती सरगर (वय ३४) व नामदेव सरगर (३१) या दोघांचा मृत्यू झाला.
जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात मृत्यू पावलेले दोघेही फळविक्रेते आहेत.
याबाबत माहिती अशी की, तासगाव-कवठेमहांकाळ राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी गावानजीक आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छोटा टेम्पो (एमएच १२, आर एन ६९०३) घेऊन कोळे (ता. सांगोला)
या गावी जाणारे सोपान मारुती सरगर (वय ३४) आणि नामदेव ज्ञानू सरगर (३१ दोघेही रा. कोळे, जि. सोलापूर) यांच्या टेम्पोला तासगावकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ०१, व्ही ए ९५१२) समोरून धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, टेम्पो उलटला. चालक सोपान सरगर हे डोक्याला मार लागून जागीच ठार झाले, तर बाजूला बसलेले नामदेव सरगर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दुसऱ्या वाहनातील चालक जितेंद्र रमेश मोरे, रमेश लिंगप्पा मोरे, रंजना रमेश मोरे, (सर्व नरळे ता. सांगोला, जि. सोलापूर) हे तिघे जखमी झाले.
सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे आणि पुढे खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मोटारचालक जितेंद्र मोरे यांच्याविरोधात नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अपघातात मृत झालेले सोपान मारुती सरगर हे सांगली येथे फळविक्री करतात. ते राहण्यासही सांगली येथेच आहेत. आज सुटी असल्याने कोळे या गावी निघाले होते, तर दुसऱ्या गाडीतील मोरे हे पत्नीसह सांगलीला निघाले होते.


0 Comments