साेलापूर जिल्ह्यातील ४२८१ सातबारे झाले जिवंत';
सांगोला तालुक्यातील महसूलच्या मोहिमेत मृतांची नावे कमी करून वारसांची नोंद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर: सातबाऱ्यावर असलेली मयताची नावे कमी करून वारसांची नोंद करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८१ सातबाऱ्यांवरील मयतांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे घेण्यात आली आहेत.
या मोहिमेत सर्वाधिक चांगली कामगिरी सांगोला तालुक्याने केली आहे. या तालुक्यातील ९९४ सातबाऱ्यावर मयतांच्या वारसांची नोंद घेण्यात आली आहे.
त्या खालोखाल मंगळवेढा तालुक्यात ५६८, करमाळा तालुक्यात ४१७, पंढरपूर तालुक्यात ३७६ सातबाऱ्यावर अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत.
ही मोहीम राबविण्यापूर्वी त्या त्या तालुक्याच्या पातळीवर मयत खातेदारांचा शोध घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात ८ हजार ४३६ मयत खातेदार आढळून आले होते.
सातबाऱ्यावरील मयतांची नावे कमी करून वारसांची नावे लावण्याबाबत ४ हजार ८०३ जणांना पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे ठरले. वारस नोंदीसाठी जिल्ह्यातून एकूण ४ हजार ५९४ प्रस्ताव दाखल झाले होते.
त्यापैकी ४ हजार २८१ प्रकरणात वारस नोंदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ५, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एक अशी एकूण सात प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.
सध्या ३०६ प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक १२१, पंढरपूर तालुक्यातील ४१, मंगळवेढा तालुक्यातील ३१ प्रकरणे प्रलंबित आहेत.
मंद्रूप अपर तहसील, करमाळा व सांगोला तहसीलकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही. जिवंत सातबारा मोहिमेमुळे वर्षानुवर्षे रखडलेला विषय मार्गी लागत आहे.
0 Comments