कोल्हापूर हादरलं! स्तनपान करताना महिलेनं सोडला प्राण, मृत्यूचं गूढ वाढलं; डॉक्टर म्हणाले...
कोणाला कधी आणि कसा मृत्यू येईल सांगता येत नाही. असाच काहीशी विचित्र घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमध्ये एका महिलेने प्राण गमावला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे स्तनपान करत असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. नेमकं तिला काय झालं हे कळण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
नेमकं घडलं काय?
कोल्हापुरातील संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनी येथे ही घटना घडली आहे. मयत महिलेचं नाव रचना चौगले असं आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने रचनाचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं खरं कारण समजणार आहे.
पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आठवडाभरापूर्वीच रचनाच्या मुलीच्या बारशाचा मोठ्या थाटामाटात कार्यक्रम पार पाडला होता.
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलं आहे. पण दूध पाजता पाजता एका आईचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्तनपान करताना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
सामान्यपणे स्तनपान करताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूपच कमी असते, असं या विषयातील तज्ञ मंडळी सांगतात. खरं तर, स्तनपान केल्याने
हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. पण काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी (पीपीसीएम) सारख्या हृदयविकारांमुळे स्तनपान थांबवण्याचा सल्लाही दिला जातो.
पीपीसीएम म्हणजे काय?
पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी म्हणजेच पीपीसीएमचा त्रास असलेल्या महिलांचं हृदय कमकुवत होते. त्यांच्या हृदयाचे स्थायू नाजूक होतात. प्रोलॅक्टिन हार्मोनची भूमिका या स्थितीस कारणीभूत असू शकते
म्हणूनच असा त्रास असलेल्या माहिलांना स्तनपान थांबवण्याचा सल्ला दिला जातो. हृदयासंदर्भात इतर काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्तनपान थांबवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जातो.
थोडक्यात निष्कर्ष काय?
अगदी थोडक्यात निष्कर्ष सांगायचा झाला तर स्तनपान हे आई आणि बाळ दोघांसाठीही फायद्याचे असते. हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी स्तनपान एक चांगला मार्ग आहे.
परंतु, काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनपान थांबवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
आता कोल्हापूरमधील या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू नक्की कशाने झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.
0 Comments