गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार 'धुरळा'; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत
सोलापूर : खासदारकी झाली, आमदारकी झाली. गावातील राजकारण हलवून सोडणाऱ्या झेडपी अन् ग्रामपंचायतीच्या निवडणुका मात्र रखडल्या होत्या.
गावगाड्यातील राजकारणाचा धुरळा उडवून देणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटना या आठवड्यात घडणार आहेत.
सोमवारी (ता. १४) जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची आरक्षण सोडत होणार आहे.
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांनी गावाच्या राजकारणावर अभिनय केलेल्या
धुरळा या मराठी चित्रपटातील चित्रच जिल्ह्यातील गावागावात मंगळवारनंतर बघायला मिळणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी ग्रामपंचायत,
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे चित्रच स्पष्ट होणार आहे. कोण येणार, कोण कुठे उभारणार या चर्चेचा धुरळा सुरुवातीला आणि दिवाळीनंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.
सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ६०० हून अधिक ग्रामपंचातींच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी व त्या अंतर्गत येणाऱ्या ११ तालुका पंचायत समित्यांच्या १३६ गणांसाठी सोमवारी (ता. १४) प्रारूप प्रभागरचना प्रसिध्द केली जाणार आहे.
माळशिरस तालुक्यातील गटांची संख्या ११ वरून ९ झाली आहे. या तालुक्यात अकलूज नगरपरिषद, श्रीपूर-म्हाळुंग व नातेपुते नगरपंचायत झाल्याने या तालुक्यातील दोन गट कमी झाले आहेत.
करमाळ्यातील गटांची संख्या ५ वरून सहा व उत्तर सोलापूर तालुक्यात २ वरून तीन झाली आहे. मोहोळ तालुक्यात अनगर नगरपंचायत व बार्शी तालुक्यात वैराग नगरपंचायत नव्याने झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेत माळशिरस, उत्तर सोलापूर, करमाळा, मोहोळ आणि बार्शी तालुक्यात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. सोमवारी ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच
मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे कोणी कुठे उभा रहायचे आणि कोणी कोणाला कशी मदत करायची? याची ॲडजेस्टमेंट मंगळवारी रात्रीपासूनच सुरू होणार आहे.
असे असणार जिल्हा परिषदेचे गट
माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ९, पंढरपूर तालुक्यात ८, माढा व सांगोला तालुक्यात प्रत्येकी ७, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट,
करमाळा व बार्शी या तालुक्यात प्रत्येकी सहा जिल्हा परिषद गट असणार आहेत. मंगळवेढा तालुक्यात ४ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ३ गट असणार आहेत.
एका गटात दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे. साधारणता ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद-पंचायत समित्यांची निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आकडे बोलतात...
सध्याची मतदारसंख्या : २४ लाख ५४ हजार ४९४ (१ जुलै २०२५ नूसार)
मतदान केंद्र : ३ हजार १०२
मतदान यंत्र आवश्यक : ३ हजार ७२२
मतदान यंत्र उपलब्ध : १ हजार ८३१
लागणारे मनुष्यबळ : १७ हजार ४७८
झेडपी प्रभाग रचनेचे वेळापत्रक
प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी : १४ जुलै
प्रभागरचनेवर दावे व हरकतींची मुदत : २१ जुलैपर्यंत
दावे व हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी : ११ ऑगस्टपर्यंत
जिल्हा परिषदेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी :१८ ऑगस्टपर्यंत
0 Comments