खळबळजनक..कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिऊन पिता पुत्राने संपविले जीवन
मीरज - सोनी (ता. मिरज) येथे कौटूंबिक वादातून पिता-पुत्रांनी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे किटकनाशक पिवून जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
गणेश हिंदूराव कांबळे (वय-५१) आणि इंद्रजीत गणेश कांबळे (वय-२२, दोघेही रा.सोनी) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कौटूंबिक वादातून कांबळे पिता पुत्रांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत गणेश कांबळे हे शेतकरी असून त्यांची भोसे रस्त्यावर द्राक्षबाग आहे. निर्यातक्षम द्राक्षांची शेती करण्यात गणेश यांच्यासह इंद्रजीतची परिसरात ओळख होती.
मुलगा इंद्रजीत याचे आठ जून रोजी मिरज येथील मुलीशी विवाह झाला होता. या विवाहावरुनच कांबळे पिता पुत्रात वाद होत होता.
गुरुवारी रात्रीही त्यांच्यात वाद झाल्याचे समजते. यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गणेश कांबळे हे भोसे रस्त्यावरील आपल्या शेतात आले व त्यांनी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे
किटकनाशक पिवून आत्महत्या केली. त्यानंतर थोड्याच वेळाने मुलगा इंद्रजीत हाही शेतात आला व त्याने वडिलांना मृतावस्थेत पाहिले.
यानंतर त्याने गावातील काही व्यक्तींना आणि नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यानेही गणेश कांबळे यांनी पिलेल्या बाटलीतीलच द्रव्य पिले. घटनेची माहिती
मिळालेल्या ग्रामस्थांनी तत्काळ शेतात धाव घेत कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, तत्पर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनाही चांगलाच धक्का बसला. मिरज ग्रामीण पोलिसांचेही पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला.
मृत गणेश कांबळे यांना दोन मुली आणि इंद्रजीत हा एकुलता एक मुलगा होता.
0 Comments