कुपवाड हादरले : रात्री मित्रांची पार्टी, पहाटे डोक्यात व चेहऱ्यावर वार करून तरुणाचा निर्घृण खून
कुपवाड : कुपवाड येथील रामकृष्णनगर परिसरात बुधवारी (दि.२३) पहाटे अमोल सुरेश रायते (वय ३२) या सेट्रींग काम करणाऱ्या तरुणाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून निर्घृण खून केला.
ही घटना स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर घडली. हल्लेखोरांनी अमोल रायते याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल रायते हा एकटा राहत होता. मंगळवारी रात्री त्याच्या घरी मित्रांनी पार्टी केली होती.
त्यानंतर मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास अमोलला घराजवळील मंदिरासमोरील रस्त्यावर आणून धारदार शस्त्राने डोक्यात, छातीवर गंभीर वार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही तासांतच दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे कुपवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments