सांगोला तालुक्यातील या गावात एसटी बसला थांबा मिळविण्यासाठी रस्त्यावर झोपण्याचा इशारा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
वाटंबरे : वाटंबरे (ता. सांगोला) येथील समाजसेवक महादेव पवार हे 1994 पासून वाटंबरे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस यांना थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र थांबा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बसेसना थांबा मिळत नसेल तर रस्त्यावर झोपून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पवार यांनी लोकप्रतिनिधी, राज्यपरिवहन महामंडळाकडे केली आहे.
वाटंबरे येथे बसेस थांबाव्यात म्हणून महादेव पवार यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. समक्ष भेटी घेऊन सांगितले. परंतु, त्यांच्या या मागणीला संबंधित विभागाने केराची टोपली दाखवली आहे.
अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरण, सांगोला पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, राज्य परिवहन महामार्ग मंडळ, जिल्हा पोलिस प्रमुख ग्रामीण,
विभाग नियंत्रक सोलापूर, महाव्यवस्थापक मुंबई, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, माजी आ. दिपक साळुंखे यांना निवेदनाद्वारे रस्त्यावर झोपण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे .
वाटंबरे गाव हे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जागृत खंडोबा देवस्थानसाठी प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्र, कर्नाटक येथील भक्त मोठ्या संख्येने येतात. येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांचे येणे जाणे राहते.
तसेच प्रवांशासाठी येण्या जाण्यासाठी सोयीस्कर असे ठिकाण आहे. या गावाच्या बाजूला अजनाळे, यलमार मंगेवाडी, चिनके, राजुरी, मानेगाव, निजामपूर, अकोला या गावातील
नागरिकांना रत्नागिरी, नागपूर, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी हे सोयीस्कर ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीयकृत बँका, मोठे व्यवसाय असल्याने
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू राहते. बाहेर जाण्यासाठी हे ठिकाण या नागरिकांना सोयीस्कर आहे. असे असताना मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथे थांबत नाहीत.
त्या बसेस यांना थांबा द्यावा, अशी मागणी केली आहे. तरी संबंधित विभागाच्या या आड मुठी धोरणामुळे राज्य परिवहन महामंडळाचा ही महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे
शासन हे प्रवासी संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असताना संबंधित विभाग हा याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.
तरी या निवेदनाची दखल घेत सर्व बसेसना वाटंबरे येथे थांबा देण्याची मागणी महादेव पवार व प्रवाशांमधून होत आहे.
0 Comments