अजबच...! प्रशासनाने खुला केलेल्या रस्त्यावर पेरली बाजरी; तिघा शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..
महसूल प्रशासनाने वाहतुकीसाठी खुला केलेला रस्ता नांगरून त्या ठिकाणी बाजरी पिकाची पेरणी केल्याची घटना
चिचोली ता.सांगोला येथे घडली आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी महेश गणपत जाधव यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून आदेश जालिंदर इंगळे, प्रशांत जालिंदर इंगळे, धनाजी लक्ष्मण इंगळे (सर्व रा. चिंचोली, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील सोपान दामू इंगळे व इतर लोकांनी
चिचोली दहिवडी रस्ता ते जमीन गट नं. २५३ पर्यंत जाण्यासाठी नवीन रस्ता मिळणेबाबत तहसिलदार यांचेकडे सन २०१९ रोजी अर्ज दाखल केला होता.
त्या अनुषंगाने सांगोल्याचे तहसिलदार यांनी पाहणी करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार रस्ता मंजुर करणेबाबत आदेश दिला होता.
सोपान दामु इंगळे व इतर लोकांनी तहसिलदार यांचेकडे पोलिस बंदोबस्तात रस्ता खुले करणेबाबत पत्र दिले होते.
त्यानुसार मंडळ अधिकारी महेश जाधव यांनी २७ मार्च २०२४ रोजी पोलीस बंदोबस्तात आदेशात नमूद केल्याप्रमाणे नवीन रस्ता करण्यात आला होता.
नवीन रस्ता केल्याबाबत अर्जदार सोपान दामू इंगळे यांचे समक्ष दोन पंचासमक्ष पंचनामा केला होता. मात्र आदेश जालिंदर इंगळे, प्रशांत जालिंदर इंगळे, धनाजी लक्ष्मण इंगळे यांनी नवीन रस्ता उकरुन उत्तर बाजुस जमीन गट नं ३०७ मध्ये बाजारीचे पीक केले आहे.
याबाबत सोपान इंगळे यांनी तहसिलदार यांना लेखी अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने चिंचोली गावच्या शिवारातील चिंचोली दहिवडी रस्ता ते जमीन गट नं. २५३ पर्यंत जाण्यासाठी नवीन रस्त्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता
आदेश जालिंदर इंगळे, प्रशांत जालिंदर इंगळे, धनाजी लक्ष्मण इंगळे यांनी नवीन रस्ता उकरुन उत्तर बाजूस जमीन गट नं. ३०७ मध्ये बाजरीचे पीक केले असल्याचे दिसून आले आहे.
0 Comments