खळबळजनक..लाडकी बहीण योजना लाभासाठी जन्मतारखेत बदल,
वेगवेगळी आधार कार्ड; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही योजना बंद होणार, सुरु राहणार की, त्याची रक्कम कमी केली जाणार? असे एक ना अनेक प्रश्न असतानाच राज्य सरकारही अस्वस्थ आहे.
कधी निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेसाठी दाखल केलेला अर्ज. त्याची पडताळणी करता करता सरकारच्या नाकी नऊ आले असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
काही बिलंदर महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क एकाच वेळी दोन दोन आणि तीसुद्धा वेगवेगळी आधार कार्ड अपलोड केल्याचे पुढे आले आहे.
काहींनी तर चक्क या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या जन्मतारखांमध्येही बदल केला आहे. हा प्रकार पुढे येताच संबंधित विभागाने या लाभार्थ्यांचा लाभ थांबवला असल्याचे समजते.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब
लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर सुरु करण्यात आली. या योजनेसाठी पात्रतेचे निकष आणि अटी असल्या तरी राज्य सरकारनेच योजनेचा लाभ सरसकट दिला जाईल म्हटले.
त्यामुळे राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. धक्कादायक म्हणजे राज्य सरकारनेही हे अर्ज मंजूर करत लाभ वितरण सुरु केले.
परिणामी अनेक महिलांनी योजनेचा चुकीच्या पद्धतीनेही लाभ घेतला. जसे की, वयाचा निकष लावता लाभ मिळत नाही म्हटल्यावर 19 ते 20 या वयोगटातील अनेक मुलींनी चक्क आधार कार्डवरील आपली जन्मतारीखच बदलली
आणि वयवर्षे 21 पूर्ण असल्याचे दाखवल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्येक निकषांची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय पुढील लाभ मिळणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
निकष डावलून अर्ज
प्राप्त माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातून लाडकी बहीण योजना लाभासाठी जवळपास 11 लाख नऊ हजार अर्ज आले आहेत.
तर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या तब्बल अडीच कोटी इतकी सांगितली जाते.
वास्तविक पाहता ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असा निकष आहे.
शिवाय लाभार्थ्याच्या नावावर कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे अशीही अट आहे.
याशिवाय इतरही काही अटी आणि निकष आहेत. प्रत्यक्षात मात्र निकषांकडे दुर्लक्ष करुन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
अर्जदारांकडून दिशाभूल, चुकीची कागदपत्रे
सोलापूर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी सामटीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार,
जिल्हतून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करुनही लाभ न मिळाल्याच्या 775 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी अनेक महिलांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही.
काहींनी तर एकाच वेळी दोन वेगवेगळी आधारकार्ड अपलोड केली आहेत.
तर काहींनी योजनेचा लाभ मिळविण्याासाठी चक्क जन्मतारखांमध्येच बदल केला आहे. त्यामुळे अशा घटना उघडकीस आलेले अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
0 Comments